Rahul Shewale: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याविरोधात एसआयटी चौकशी (SIT Probe) करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी दिले आहेत. विधान परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उपस्थित केला. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले. 


आज विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एनआयटी भूखंड प्रकरणी बॅकफूट गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज काही वेळा स्थगित करावे लागले होते. तर, विधान परिषदेत राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवरून विरोधकांनी रान उठवले होते. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाजही स्थगित करण्यात आले होते. 


विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, राहुल शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. मात्र पोलिसांचा पीडितेवर दबाव आहे. पीडित तरुणीला मुंबईत यायचे आहे. मात्र, दबावामुळे ती मुंबईत येऊ शकत नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. या पीडित तरुणीच्या जीविताला धोका असल्याचे कायंदे यांनी म्हटले. एसआयटी स्थापन करून राहुल शेवाळे यांची चौकशी करा अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली. 


राहुल शेवाळे यांच्यावरील आरोपांची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे राज्य सरकारला एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. 


राहुल शेवाळे यांचे आदित्य ठाकरेंवर आरोप


खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये आदित्य ठाकरे यांना 44 वेळा फोन केला असल्याचे त्यांनी बिहार पोलिसांच्या हवाल्याने सांगितले. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केलेल्या या वक्तव्यानंतर आज सत्ताधारी आक्रमक झाले होते. दिशा सालियान प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: