Devendra Fadnavis : काँग्रेसने गांधी विचार टोपीपुरता ठेवला, फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला
Devendra Fadnavis : गांधी विचार देशाला समृध्द करतो, मात्र काँग्रेसने गांधी विचार टोपी पुरता ठेवला असल्याचं वक्तव्य उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
Devendra Fadnavis : गांधी विचार देशाला समृध्द करतो, मात्र काँग्रेसने (Congress) गांधी विचार टोपी पुरता ठेवला असल्याचं वक्तव्य उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. निलंगा येथे माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे जॅकेट घातले होते. तसेच टोपी देखील घातली होती. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांवर टोलेबाजी केली.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
शिवाजीराव निलंगेकर पाटील हे कट्टर काँग्रेस पार्टीचे नेते होते. त्यांचे विचार गांधीवादी होते. तुम्ही ही टोपी घातली आहे तीही उपमुखमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यासमोर. यात तुमच्या मंत्रीपदावर काही परिणाम होणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना लगावला. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना प्रतिउत्तर दिले. गांधी विचाराने देश समृद्ध होईल. मात्र, तुम्ही गांधीजींना टोपीपुरते मर्यादित ठेवल्याचे फडणवीस म्हणाले. आता संभाजी पाटील निलंगेकर यांनी घातलेले टोपी आणि जॅकेट विकासाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सामना
शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे आमदार होते, त्यावेळी त्यांच्या विरोधात नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत संभाजी पाटील विजयी झाले होते. पुढील निवडणुकीत आजोबांनी नातवाचा पराभव केला होता. त्यानंतर काका अशोक पाटील निलंगेकर यांचाही संभाजी पाटील निलंगेकर यांनी पराभव केला होता. आज त्यांनी आजोबाची टोपी आणि जॅकेट घातले होते. यावर जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सामना रंगला. या देशात महात्मा गांधींचा विचार पुढे न्यावाच लागेल. गांधींच्या विचारानेच हा देश समृद्ध होऊ शकतो असेही फडणवीस म्हणाले. आपण सगळे मिळून गांधींजींचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करु असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
आपल्या सगळ्यांचे ध्येय हे विकासाचे
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना अपेक्षित असणारा विकास पुढे नेण्याचं काम संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं असल्याचं फडणवीस म्हणाले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून छोटे छोटे बंधाऱ्याचे काम करण्याचं काम संभाजी पाटील यांनी केले आहे. आपल्या सगळ्यांचे ध्येय हे विकासाचे आहे. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करु असेही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: