पुणे : पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांना नवीन समन्स बजावले. गुरुवारी 1 जुलै रोजी ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलाला ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहायला सांगितलं होतं. भोसले यांनी कोविडचे कारण सांगत ईडीला त्यांची अनुपलब्धता कळविली आहे. 


अविनाश भोसले यांनी पुण्यात निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारती बांधली असल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे. भोसले यांनी संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा ही आरोप करण्यात आला आहे. भोसले हे महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांनी त्यांच्यावर ईडीने जारी केलेले समन्स टाळण्यासाठी सर्व देशभर कोविडची साथ असल्याचं नमूद केलं आहे.


ईडीच्या सूत्रांनी सांगितलं की, नोकरशहांच्या घरांच्या बांधकामासाठी आरक्षित भूखंडावर भोसले यांनी व्यावसायिक इमारत बांधली. या बांधकाम व्यवहाराची ईडी चौकशी करीत आहे. भोसलेची रिअल इस्टेट कंपनी ‘एबीआयएल’ विरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर ईडीचा खटला आधारित आहे. भोसले यांनी नियमावलीत फेरफार करून भूखंड ताब्यात घेण्यास व्यवस्थापित केले आणि नंतर त्या भूखंडावर व्यावसायिक संकुल बांधल्याचा आरोप आहे. 


ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणात पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. शोध घेतल्यानंतर अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले यांनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टाकडे धाव घेतली असून कोर्टाचा निर्णय अद्याप बाकी आहे.


गेल्याच महिन्यात ईडीने भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999. (फेमा) अंतर्गत स्वतंत्र चौकशीत सुमारे 40 कोटींची संपत्ती जप्त केली होती. भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी फेमाच्या उल्लंघन करत दुबईत मालमत्ता संपादन केल्याचे एजन्सीला आढळलं होतं.


महत्वाच्या बातम्या :