सांगली: ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने राज्य सरकारबद्दल खंत व्यक्त केली आहे.

कुस्ती खेळण्यासाठी मी बाहेर जातो, त्यावेळी चाहते मला नोकरी मिळाली का? मुख्यमंत्र्यानी तुला नोकरी दिली का? हा प्रश्न विचारतातच, असं विजयने सांगितलं. तो 'एबीपी माझा'शी बोलत होता.

"माझे वडील दर मंगळवारी मंत्रालयात जाऊन नोकरीबाबत विचारणा करतात. त्यांना वेगवेगळी कारणे सांगितले जातात. आता मुख्यमंत्री एवढे चांगलं काम करत आहेत. महापालिकाच्या निवडणुकीत त्यांना इतकं चांगलं यश मिळालंय. पण माझा एक छोटासा नोकरीचा विषय त्यांच्याकडून तडीस लावला जात नाही, याची मला खंत वाटते", असं विजय म्हणाला.

12-12 किलोचे डंबेल्स, गळ्यात 20 किलोची साखळी, विजय चौधरीची मेहनत


केवळ मलाच नव्हे तर महाराष्ट्राती सर्व नामांकित खेळाडूंना मुख्यमंत्र्यांनी नोकरी दिली, तर त्यांचे सरकार महाराष्ट्रातून कधीच जाणार नाही, असा भोळा आशावाददेखील विजय चौधरीने व्यक्त केला.

आठवडाभरात नोकरी देण्याचं आश्वासन हवेत

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत विजय चौधरींचं अभिनंदन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली होती.

विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

'महाराष्ट्र केसरी' विजय चौधरीबद्दल माहिती  :

  • विजय चौधरी 2014 आणि 2015 साली सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी किताबासाठी खेळण्याचा आणि तो जिंकण्याचाही अनुभव होता. यावेळीही त्या अनुभवाच्या आधारे खेळत सलग तिसऱ्यांदा विजयने 'महाराष्ट्र केसरी'चा किताब आपल्या नावावर केला.

  • वय - 28 वर्षे

  • उंची - 6 फूट 2 इंच

  • वजन - 118 किलो

  • धूमछडी आखाडा आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र

  • प्रशिक्षक - रोहित पटेल, ज्ञानेश्वर मांगडे आणि अमोल बुचडे

  • मुख्य वैशिष्ट्यं - संयम, बचाव आणि प्रतिहल्ला ही खेळाची वैशिष्ट्यं




संबंधित बातम्या :
महाराष्ट्र केसरी विजय चौधरींना शासकीय सेवेत घेणार : मुख्यमंत्री

जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'

12-12 किलोचे डंबेल्स, गळ्यात 20 किलोची साखळी, विजय चौधरीची मेहनत