मुंबई : कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन आज (27 फेब्रुवारी) साजरा केला जाणार आहे. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने आज गेट वे ऑफ इंडिया इथे मराठी भाषा गौरव दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमात भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. शिवाय भव्य सांगितीक कार्यक्रमही सादर होणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता गेट वे ऑफ इंडिया इथे होईल. या कार्यक्रमावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित असतील.

यानिमित्ताने 'एक परिच्छेद विकिपिडियावर' ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यात मराठी भाषा गौरव दिनी जगभरातील मराठी भाषिकांनी मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टाईप करायचा आहे.

विकिपिडियाचा वापर जगातील असंख्य लोक एक मुक्त ज्ञानकोष म्हणून करतात. हे लक्षात घेऊनच मराठी भाषा गौरव दिनी जगभरातील मराठी भाषिकांनी मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टाईप करावा, असं आवाहन सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आलं आहे.