अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्या मुलाने हॉटेलमध्ये तोडफोड करुन मालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जगताप यांनी शनिवारी दुपारी अहमदनगर-पुणे मार्गावरील हॉटेल महाज्योतची पूर्व वैमनस्यातून तोडफोड केल्याचं बोललं जात आहे.


सचिन जगताप यांच्यासह 20-29 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हॉटेलचे मालक हर्षवर्धन कोतकर, त्यांचे वडिल महादेव कोतकर, यांच्यासह हॉटेल कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्याने आणि हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. हॉटेलबाहेर गाड्यांची तोडफोड केली आणि साडे तीन लाख रुपये किंमतीच्या अंगठ्या, गळ्यातील चैन लांबवली, अशी तक्रार करण्यात आली आहे.

याप्रकरणी दरोडा, मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.