Maharashtra Kesari women wrestling competition : महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात आता पुरूष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सांगलीत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 


पुण्यात आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते.   


महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीमधील निर्णयानुसार 23 आणि 24  मार्च रोजी सांगलीत या स्पर्धा पार पडणार आहेत. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी दिली आहे.  


महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यानुसार 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 असे वजनी गट असतील. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल खिताबासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.


कुमार गटाच्याही होणार स्पर्धा 


महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबरोबरच 25 आणि 26 मार्च  कोल्हापूर येथे कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाही होणार आहेत. शिवाय वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा 27 आणि 28 मार्च रोजी कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र इथं अमोल बुचडे आणि अमोल बराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  


 


खिताब आणि चांदीची गदा देऊन गौरव


महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी खिताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्याध्यक्ष तसेच सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी माहिती दिली आहे. 


कोणाला मिळणार पहिला महाराष्ट्र केसरीचा खिताब  


महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकणाऱ्या महिला पहिलवानाची इतिहासात नोंद होणार आहे. कारण या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.  


महत्वाच्या बातम्या 


Shivraj Rakshe: सिकंदरवर खरोखरच अन्याय झाला का? सिकंदर आणि महेंद्रच्या त्या कुस्तीवर महाराष्ट्र केसरी शिवराज म्हणाला...