Maharashtra Kesari Kusti Competition : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे. 


महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यंदा साताऱ्यात आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताबासाठीच्या 64व्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं 4 ते 9 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात खेळवण्यात येईल. कोरोनाच्या संकटात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या पैलवानांना महाराष्ट्र केसरी कुस्तीची यंदा मोठी प्रतीक्षा होती. कोरोनाच्या प्रादुर्भावात झालेली घट लक्षात घेऊन साताऱ्यासह राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांमध्ये नुकतीच सूट देण्यात आली आहे.


पाहा व्हिडीओ : पैलवानांची प्रतीक्षा संपली, चलो सातारा! साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचं आयोजन



कोरोनाची भीती गेली, आता तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा तातडीनं भरवा. यासाठी कुस्तीगीर परिषदेनं पावलं उचलावीत, अशी मागणी राज्यभरातील पैलवान तसचं कुस्तीप्रेमींकडून केली जात होती. कोरोनामुळं इतर क्षेत्रांप्रमाणेच कुस्तीलाही फटका बसला होता. अशातच आता तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रातील मानाच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन कुस्तीगीर परिषदेकडून साताऱ्यात केलं जात आहे. 


दरम्यान, यापूर्वीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 मध्ये पार पडली होती. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली होती. हर्षवर्धनने शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha