Banana Price In Jalgaon : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सोन्यापाठोपाठ (Gold Price) केळीला (Banana) उच्चांकी दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचं एकीकडे पाहायला मिळत असताना दुसरीकडे केळीच्या दरातही यंदा मोठी वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळीला देशभरात मोठी मागणी
दर वर्षी हिवाळ्यात केळीच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं नेहमीच चित्र असते, अगदी उत्पादन खर्च ही या मध्ये निघेनासा असतो, मागील वर्षी याच काळात केळीचे दर तीनशे ते साडेतीनशे रुपये क्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नसल्याने मोठे नुकसान सोसावे लागले होते. यंदा मात्र थंडीचे प्रमाण कमी असल्याने त्याचबरोबर इतर राज्यात केळीचे उत्पादन कमी झाल्याने आणि जळगाव जिल्ह्यातील केळीला देशभरात मोठी मागणी निर्माण झाली असल्याने यंदा उच्चांकी भाव मिळत आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
यंदा कधी नव्हे तो हिवाळ्यात एक नंबर निर्यातक्षम केळीला 2500 रुपये तर दोन नंबर केळीला 1500 ते 1800 इतका उच्चांकी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र केळीवरील वाढता उत्पादन खर्च पाहता आणि संकट पाहता असाच भाव वर्षभर मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळीची चव जगातील कोणत्याही केळीपेक्षा वेगळी
तामिळनाडू आणि गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातील जळगावमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. केळी हे मध्यम तापमानाच्या दमट हवामानाचे पीक म्हणून ओळखले जात असले तरी जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठी येणारी केळी कोरड्या हवामानात येते. इथले तापमानही 40 अंशापेक्षा जास्त असतं. तापी खोर्यातील काळी माती व शेणखताचा होणारा वापर यामुळे या केळीला इतर ठिकाणच्या केळींपेक्षा जास्त गोडवा आहे आणि तोच या केळींचे आकर्षण वाढवणारा आहे. काळी माती, उष्ण तापमान व शेणखताचा वापर यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीची चव जगातील कोणत्याही केळीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच देशात केळीच्या व्यापारात तिसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रातील 67 टक्के केळी केवळ जळगाव जिल्ह्यात पिकते आणि 2400 कोटी रुपयांचे उत्पन्न या भागातील शेतकऱ्यांना मिळवून देते. देशभरात जळगावची ओळख केळीबरोबरच सुवर्णनगरी म्हणूनही झाली आहे.
इतर बातम्या
Vel Amavasya : हिरवाईचा अपूर्व सोहळा म्हणजे वेळ अमावस्या, वाचा काय आहे परंपरा?