23 December Headlines: हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार आहे. आज राज्यभरात युवक काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


आज राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची नेमणूक असं त्यांच्या दौऱ्याचं उद्दिष्ट आहे. सकाळी 10 वाजता नागपुरात त्यांचं आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका आहेत. राज ठाकरे सकाळी 7 वाजता त्यांच्या मुंबईतील घरातून निघणार आहेत.


आमदार मुक्ता टिळकांवर आज अंतिम संस्कार


आमदार मुक्ता टिळक यांचे पार्थिव सकाळी 9 ते 11 या कालावधीत पुण्यातील केसरी वाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


हिंगोली: स्वाभिमानी शेतकरी संघटने कृषी अध्यक्ष कार्यालयावर मोर्चा 
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अध्यक्ष कार्यालयावर शेकडो शेतकरी घेऊन मोर्चा काढला जाणार आहे. पिक विमासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर सहभागी होणार असून गोरेगावपासून ते हिंगोली पर्यंत रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या गाड्यांचा ताफा येणार आहे. पोलिस हा ताफा अडवण्याची शक्यता आहे,  दुपारी 1 वाजता. 


मराठा सेवा संघच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात


परभणी- मराठा सेवा संघच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आज शोभायात्रा व ग्रंथदिंडी चे आयोजन करण्यात आले आहे.  दुपारी 3 वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही शोभा यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेत छत्रपती शिवरायांचा सजीव देखावा, छत्रपती शिवरायांची मूर्ती, हलगी पथक,घोडेस्वार, लेझीम पथक, वारकरी, वासुदेव, गोंधळी बॅन्ड सहभागी होणार आहेत. 


महाराष्ट्र राज्य किसान सभेची आज पदयात्रा 
 
वर्धा- महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी ते नागपूर पदयात्रा करत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरिता संघर्ष दिंडी पदयात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. आज वर्धा जिल्ह्यातील बरबट्टी येथून निघत ही पदयात्रा नागपूर विधानभवनवर जाणार आहे. या पदयात्रेत अनेक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत, सकाळी 10 वाजता.