जळगाव : नेहमी असे म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. परंतु, या म्हणीला अपवाद ठरेल अशी एक वेगळीचं घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहाण गावात घडलीय. एका जिगरबाज पतीने ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या दोन्ही बायका निवडून आणल्या आहेत. ही घटना संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. 


आपल्या दोन्ही बायका ग्रामपंचायतीमध्ये निवडूण आणलेल्या पतीचे नाव आहे विलास पाटील. विलास पाटील हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. विलास पाटील यांनी आपल्या पहिल्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले होते. त्यानंतर गावात पोटनिवडणुकीची आलेली संधी पाहून दुसऱ्या पत्नीलाही ग्रामपंचायत सदस्यपदी त्यांनी निवडून आणले. ही घटना जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या दोन्ही पत्नी गावच्या राजकारणात विलास पाटील यांनी सक्रीय केल्या आहेत. गावच्या विकासात या दोन्ही पत्नीचा  सहभाग होणार असल्याने खुश झालेल्या पती विलास पाटील यांनी आपल्या दोन्ही पत्नीचं चक्क औक्षण करून आणि त्यांना पेढा भरवून आपला आनंद व्यक्त केलाय.


विलास पाटील हे शिवसेनेचे कट्टर सैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीवर त्यांचं अतोनात प्रेम असल्याने त्यांनी आपल्या घराचं नाव देखील मातोश्री ठेवलं आहे. पहाण गावातील शाखाप्रमुख असलेल्या विलास पाटील यांनी आपल्या पहिल्या पत्नीला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणले होते. विलास पाटील यांचा स्वभाव आणि त्यांनी केलेली कामे पाहून गावकऱ्यांनी त्यांच्या पत्नीला भरघोस मतांनी निवडून दिले होते.


विलास पाटील यांना मूलबाळ न झाल्याने, त्यांनी दुसरे लग्न केले होते. एक ग्रामपंचायत सदस्य होती तर दुसरी गृहिणी होती. अशातच मागील काही महिन्यापूर्वी कोरोनामुळे एका महिला ग्रामपंचायत सदस्याचे निधन झाले. त्या रिक्त झालेल्या जागेसाठी पुन्हा नव्याने नुकतीच पोट निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत विलास पाटील यांच्या दुसऱ्या पत्नीला त्यांनी उभे केले होते. यावेळी त्यांच्या विरोधात चार प्रबळ उमेदवार उभे होते. मात्र अखेर विलास पाटील आणि त्यांच्या पहिल्या पत्नीने केलेली काम पाहता पहाणच्या ग्रामस्थांनी पाटील यांच्या दुसऱ्या पत्नी संध्या पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले.


आपण गावच्या विकासाप्रती केलेली काम आणि गावकऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळेच गावकऱ्यांनी आपल्या दोन्ही पत्नींना निवडून दिल्याचं विलास पाटील यांनी सांगितले. विलास पाटील यांच्या दोन्ही पत्नी ममता आणि संध्या पाटील या गुण्या गोविंदाने राहत आहेत. आम्ही दोघीही विलास पाटील यांच्या दोन्ही पत्नी असलो तरी आमचे दोघींचे नाते हे बहिणीप्रमाणे राहिले आहे. ममता या निवडणूक रिंगणात उभ्या होत्या, त्यावेळी संध्या यांनी त्यांना सहकार्य केले होते. आता संध्या निवडणुकीत उभ्या असताना ममता यांनी सहकार्य केले. याशिवाय गावाचं आमच्या कुटुंबावर असलेले प्रेम आणि आमदार किशोर पाटील यांचं सहकार्य यामुळेच आम्हाला हे यश मिळाले असल्याचे विलास पाटील यांच्या दोन्ही पत्नींनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: