Maharashtra Inflation : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं जगाची चिंता वाढली आहे. यामुळे जगभरातील देशांत महागाईनं कळस गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं कच्च्या तेलाच्या दरांत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात तब्बल चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच आहेत. असं असलं तरीही देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. पण, तरिही देशातील महानगरांत दर सर्वाधिक आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. या इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंवरही होणार आहे. आता राज्यात दूधाच्या दरांतही वाढ (Milk Rate) करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे. 


आता तुम्ही म्हणाल की, पेट्रोल-डिझेलचा किमतींचा आणि दूध दरांचा संबंध काय? आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होतो आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांचा परिणाम हा इतर वस्तूंवर होतो. कारण माल वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पेट्रोल-डिझेल. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर माल वाहतुकीचा खर्चही वाढतो. परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होते. देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. तरिही दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 


दूध दरांत किती रुपयांची वाढ? 


सध्या राज्यात महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे. 


दूध दरवाढ का?


ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे, आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर 33 रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर 52 रुपये असणार आहे. या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्चपासून करण्यात आली आहे


राज्यातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या वतीनं दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज इत्यादी सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. दूध पावडर आणि लोणी यांचे वाढलेले दर आणि त्यामुळे दूधाची वाढती मागणी. तसेच, कमी उत्पादनामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहतूक खर्च, वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दरवाढ करण्यात आल्याची माहिती कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली आहे. 


निवडणूक निकालांनंतरही पेट्रोल-डिझेलच्या किमती 'जैसे थेच'


गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :