Sanjay Raut on BJP : खोट्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या लोकांच्या चौकशा सुरू होतात तेव्हा भाजपच्या प्रमुख लोकांना गुदगुल्या होतात. आता राज्यातले पोलीस एखाद्या गुन्ह्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांची चौकशी करू लागतात. तेव्हा त्यांनी त्याला सामोरे जावे, रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला करताय, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत भाजपला लगावला आहे. महाराष्ट्रातील पोलीस कधीही खोटे पुरावे दाखल करणार नाहीत असेही त्यांनी म्हटले.


राज्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई बँक घोटाळ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, केंद्रीय महाविकास आघाडीच्या लोकांच्या चौकशा सुरू होतात, अटकेची कारवाई होते तेव्हा भाजपच्या लोकांना गुदगुल्या होतात. त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर उतरून लेझीम खेळायचे बाकी असतात. आता मात्र, त्यांच्याविरोधात राज्यातील पोलिसांनी चौकशी सुरू केली तर आरडाओरड सुरू केली असल्याचे राऊत यांनी म्हटले. राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत, हे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून त्यांनी  दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील पोलीस खोटे गुन्हे दाखल करणार नाहीत. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. पुराव्यांशिवाय कारवाई करणार नाहीत असेही संजय राऊत यांनी म्हटले. राज्यातील तपास यंत्रणांनी एखाद्या गुन्ह्याबाबत चौकशी सुरू केल्यानंतर भाजपने आरडाओरड सुरू केलाय. रडताय कशाला, मला का बोलावले, मला का बोलावले असे बोलून नौटंकी करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जा असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.


मुंबई बँक, पीएमसी बँक घोटाळ्यात काही लोक गजाआड जाणार


मुंबई बँक घोटाळा हे एक टोक असून पीएमसी बँक घोटाळा, भूखंड घोटाळ्यात काही लोक गजाआड गेले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत यांच्या विधानानंतर अनेक तर्क काढण्यात येत आहेत. '


राज्यपालांकडून राजकारण


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यपालांकडून राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बारा आमदारांच्या नियुक्तीसह इतर मुद्यांवरून राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू असते. ज्या पातळीवर त्यांच्या पक्षाने आणि राज्यपालांनी हा संघर्ष नेऊन ठेवला आहे इतिहासात त्याची काळया अक्षराने नोंद होईल असेही संजय राऊत यांनी म्हटले.घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं हे आणिबाणीची आठवण करून देणारं असल्याचेही त्यांनी म्हटले.