मुंबई : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. 


SSC HSC Exams 2021 | 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेबाबत घेतलेले महत्वाचे निर्णय काय आहेत?


आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.  या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल, असं गायकवाड यांनी सांगितलं आहे. 


बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षेबाबत काही महत्वाचे निर्णय बोर्डाने आधीच घेतले आहेत.


लेखी परीक्षेबाबत निर्णय



  • इ. 10 वी ची लेखी परीक्षा 29/04/2021 ते 20/05/2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.

  • इ. 12 वी ची परीक्षा दि.23/04/2021 ते 21/05/2021 कालावधीमध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल.


परीक्षा केंद्रे



  • कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.


परीक्षेची वेळ 



  • दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जात असे. परंतु, यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 व 50 गुणांच्या परिक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.

  • परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.


प्रात्यक्षिक परीक्षा कधी?



  • इ. 10 वीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत. परंतु या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील.

  • प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21/05/2021 ते 10/06/2021  या कालावधीत सादर करण्यात यावेत.

  • इ. 12 वीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. 22/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत होतील.

  • कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल. 

  • कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15  दिवसात Assignment  सादर करावेत.

  • इ.10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. 


यावर्षी विशेष परीक्षेचे आयोजन



  • एखाद्या विद्यार्थ्यास परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.


पुरवणी परीक्षा कधी असणार?



  • परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.


सुरक्षात्मक उपाय योजना



  • परीक्षेसंदर्भात शाळा/कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबीसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील

  • कोविड 19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील.

  • सर्व विद्यार्थ्यांना/पालकांना आवाहन करण्यात येते की राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी.

  • इ.10 वी व 12 वी परीक्षेसाठी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड19 ची लस देण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI