नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्याला आज नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवकुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते डीएफओ पदावर कार्यरत आहे. आज नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने शिवकुमार यांना ताब्यात घेतले आहे.



दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्यावर आरोप
दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं आहे. माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे आत्महत्या केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्येपूर्वी केलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.  ही सुसाईड नोट अर्थात चव्हाण यांनी  अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याबाबत सविस्तर लिहून दिलं आहे.


मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या


दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात विनोद शिवकुमार यांना आज नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.  शिवकुमार हे रेल्वेद्वारे प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती, पहाटेच्या सुमारास ते नागपूर रेल्वे स्थानकातून जाणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर अमरावती एलसीबी पथकाने नागपूर जीआरपीच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून शिवकुमार यांना ताब्यात घेतले.  अमरावती पोलीस लगेच शिवकुमार यांना घेऊन अमरावतीच्या दिशेने निघाले आहे.