मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली. जाणून घेऊया पहिल्या दिवसातील दहा प्रमुख मुद्दे,
मुख्यमंत्री सभागृहात
गेल्या वेळच्या अधिवेशनाला गैरहजर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात हजेरी लावली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं.
राज्यपालांचे दीड मिनिटांचे अभिभाषण अन् गोंधळ
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांच्या संबंधित तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या संबंधित केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपालांना आपलं भाषण दीड मिनिटात आवरावं लागलं.
राज्यपालांनी सभागृह सोडलं
राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनीच घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं. अवघ्या दीड मिनिटात राज्यपालांनी आपले भाषण आटोपतं घेत पटलावर ठेवले आणि त्यांना सभागृह सोडावं लागलं.
राज्यपालांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी
राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंच्या संबंधित केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
राज्यपालांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर शीर्षासन
विधानपरिषदेचे आमदार संजय दौंड यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांचा निषेध करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर शीर्षासन केलं.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली. मंत्री जेलमध्ये आहे आणि राजीनामा झाला नाही असं पहिल्यांदा घडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हसिना पारकरला पैसे दिले आहेत, त्यातून नवाब मलिकांना अटक झाली आहे. हसिना पारकर ही दाऊदची बहीण आहे. दाऊदच्या बहिणीला पैसे देणे म्हणजे दाऊदला मदत करण्यासारखे आहे. दाऊदला समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जेलमध्ये स्क्रिन लावा म्हणजे मलिकांना प्रश्न विचारू शकू, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, "देशद्रोही दाऊद इब्राहिम यांच्याशी जागेचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा. देशद्रोही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. सभापती यांच्याकडे बोलण्यासाठी परवानगी मागितली परंतु त्यांनी मला बोलू दिलं नाही. त्यांनी जेलमध्ये स्क्रिन लावा म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकू." जर मंत्री जेलमध्ये असतील मग त्यांच्या खात्याच्या कमकाजाचं काय होईल, असाही सवाल त्यांनी विचारला.
मलिकांच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई मोर्चा निघणार
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाला असून अधिवेशन सुरू असताना त्यांच्या विरोधात भाजपकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत मोर्चा होणार आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे 9 मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा
ओबीसी आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका नाही
ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. मात्र राज्य सरकारनं आपली भूमिका मांडली आहे. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक होणार नाही यावर मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झालं आहे.
लता मंगेशकरांचा शोकप्रस्ताव दोन्ही सभागृहात पारित
लता मंगेशकर यांचा शोकप्रस्ताव आज दोन्ही सभागृहात मांडण्यात आला आणि तो पारित करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या: