HSC Exam : राज्यात उद्यापासून बारावीच्या (HSC Exam)  परीक्षा सुरू होणार आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदा बारावीचे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला सामोरे जाणार आहेत. मात्र कोरोनानंतर होणाऱ्या  परीक्षेच्या व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले  आहे. यापूर्वी  छोट्या महाविद्यालयातील विद्यार्थी एका सेंटरवर परीक्षेसाठी एकत्रित केले जायचे मात्र आता तसे न करता प्रत्येक महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. 


कोरोनामुळे मागील वर्षात बारावीची परीक्षा होऊ शकली नाही.  त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. यावर्षी मात्र कोरोना नियंत्रणात असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र या परीक्षा घेताना काही बदल यामध्ये सुचवले आहेत. पूर्वी चार-पाच शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा केंद्र होते. त्यामुळे केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच होम सेंटरचा पर्याय देण्यात आला आहे. ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या शाळेमध्ये  परीक्षा होणार आहे. यामुळे यापूर्वी जितके परीक्षा केंद्र होते त्यापेक्षा चौपट परीक्षा केंद्र झाले आहेत. 


परीक्षा कालावधीत अशी वाजणार घंटा


उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांच्या वेळेनुसार सकाळी घंटा वाजवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका वाटपासाठी दोन टोल वाजवले जातील. त्यानंतर प्रश्नपत्रिका वाटप करण्यासाठी एक टोल वाजवला जाणार. पेपर सोडवायला सुरूवात करण्यासाठी दोन टोल वाजवले जातील आणि त्यानंतर पहिला तास संपल्यानंतर दोन टोल.. दुसरा तास संपल्यानंतर दोन व तिसरा तास संपल्यानंतर दोन टोल जाणार आहेत आणि शेवटी दहा मिनिटे बाकी असताना एक टोल व लेखन समाप्तीसाठी शेवटचा टोल वाजवला जाणार आहे.


एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  तर प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी झिकझॅक पद्धतीने बसवण्याची व्यवस्था महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे. या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी संबंधित शाळांनी या परीक्षेच्या अनुषंगाने पर्यवेक्षकासह, केंद्र संचालक, रनर तसेच इतर आवश्यक शिक्षकाने कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना लस घेणे सक्तीचे नसले तरी स्वतःच्या सुरक्षा विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन परीक्षेला यावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.


कोरोना काळामध्ये विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते त्यामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय आता मोडली आहे. म्हणूनच बारावीच्या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना अर्धा तासाचा वेळ वाढवून देण्यात आला आहे.  पूर्वी तीन तास हा वेळ परीक्षेसाठी असायचा.  यावर्षी मात्र साडेतीन तासांचा वेळ विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी मिळणार आहे. 


परीक्षा काळात प्रशासनाकडून मनाई आदेश


परीक्षेच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परीक्षा केंद्रावर कलम 144 मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत . परीक्षा देणारे विद्यार्थी व इतर घटक परीक्षा केंद्र परिसरात उपद्रव करत असतात किंवा कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर व परिसरात व्यक्ती अधिकारी कर्मचाऱ्यांना वगळून दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे परीक्षा केंद्र असलेल्या परिसरामध्ये झेरॉक्स सेंटर ध्वनिक्षेपक बंद राहणार आहेत.  तसेच परीक्षा केंद्रामध्ये अनाधिकृत वाहनांना प्रतिबंध करण्यात आल्याचे आहे सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या :


Board Exam : दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शाळा न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम, उद्या निर्णय घेणार


HSC Exam : NDA ची मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, बोर्डाकडून 'एबीपी माझा' च्या बातमीची दखल


HSC Board Exam : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha