Maharashtra Heat Wave : राज्यातल्या अनेक शहरांत पारा 40 अंश सेल्सियसच्या पार गेलाय. हवामान खात्यानं आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कालही विदर्भातल्या अनेक शहरांचा पारा 40 अंशांपार गेला होता. इकडे कोकणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असली तरी कोकणातलं तापमान स्थिर आहे.. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे. मुंबईतली मात्र उष्णतेची लाट ओसरली असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.


उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेलं होतं. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेलं होतं. मुंबईमध्ये 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर गेला होता. दरम्यान, आज मुंबईत ग्रीन अलर्ट दिला आहे.  



काय काळजी घ्याल?


उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहिल.



  • तापमान अधिक वाढल्याने उन्हात बाहेर पडणं टाळा. घराबाहेर पडणं गरजेचं असल्यास छत्रीचा वापर करा. टोपी किंवा रुमालाने डोकं झाका. हलके आणि सुती कपडे परिधान करा.

  • हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज 500 मिली जास्त असते. त्यामुळे जरी तहान लागली नाही तरी जास्त प्रमाणात पाणी प्या.

  • चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंकऐवजी ओआरएस, लिंबू सरबत, ताक आदी पेय प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवता येऊ शकतं.


तापमानवाढ कशामुळे?


गुजरातच्या सौराष्ट्र आणि राजस्थानच्या कच्छमध्ये अनेक ठिकाणी 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याने तिथे उष्णतेची लाट आली आहे. या परिसरातून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर कोकणाच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे उत्तर कोकणासह मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील तापमान वाढलं आहे.


उष्णतेची लाटेचे निकष कोणते?


कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त असणे यालाच उष्णतेची लाट येणं म्हटलं जातं.  अशा उच्च तापमानामुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि अति आर्द्रतेमुळे लोकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होतो, यामुळे मृत्यू देखील होतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात 37 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर उष्णतेची लाट आल्याचं समजलं जातं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Heat Wave : मुंबई, कोकणात उष्णतेची लाट; उष्माघाताची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी?