मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाची आज आणि उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र ही परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. तर दुसरीकडे परीक्षा केंद्राबाबत झालेल्या घोळमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्यच असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलय.
परीक्षा ऐनवेळी रद्द
राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गौरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्या आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि आज परीक्षा केंद्रांवर पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचं सांगितलं होतं. परभणीतील रावसाहेब जामकर महिला महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्राची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह पाहणी केली आहे आणि व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
राजेश टोपे म्हणाले की, "केवळ एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केद्राची पत्ता चुकला होता, तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. आठ लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असून त्याच्या योग्य प्रकारच्या नियोजनासाठी बाह्य स्त्रोत नेमण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स डाऊनलोड होत नाहीत त्यांना ईमेल्स केले जात आहेत, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल सर्जनना याबाबत अधिकार देण्यात आले असून ते अशा विद्यार्थ्यांना मदत करतील."
आरोग्य विभागाच्या परीक्षेची सर्व तयारी झाली असल्याचं खुद्द आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट करुनही त्यांच्याच वक्तव्यानंतर केवळ काही तासातच ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI