Maharashtra Health Recruitment : राज्य सरकारकडून नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केल्यानंतर आज आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज ही घोषणा केली आहे. ठाकरे सरकारच्या काळात आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेवेळी मोठा गोंधळ झाल्यानं ही भरतीच रद्द करण्यात आली होती. पेपरफुटीच्या प्रकरणामुळं ही भरती नियोजित तारखेच्या आदल्या दिवशी रद्द करण्यात आल्यानं राज्यभर संताप व्यक्त केला गेला होता. आता या सरकारनं नव्यानं भरतीची घोषणा केली आहे. 


आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा आरोग्य विभागाची भरती घोषित करण्यात आली आहे. आज या संदर्भात माहिती देताना गिरीश महाजनांनी सांगितलं की, गेल्या काही काळात राज्यात भरतीकडे दुर्लक्ष झालं होतं. आता आम्ही 10027 हजार जागांची भरती केली जाणार आहे. 


अशा असतील महत्वाच्या तारखा


1 ते 7 7 जानेवारी दरम्यान आरोग्य विभागाची भरतीची जाहीरात निघणार आहे. 25 ते 30 जानेवारी अर्ज करता येतील. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अर्जाची छाननी तर 25 आणि 26 मार्च रोजी परीक्षा होईल. 27 एप्रिलपर्यंत उमेदवार निवड होईल. तसेच एकाच दिवशी राज्यभरात ही परीक्षा होईल.  


एकाच दिवशी परीक्षा पार पडतील


महाजन म्हणाले की, 2018 पासून भरतीची प्रतीक्षा होती. टीईटीसह आरोग्य विभागाचा घोटाळा गेल्या सरकारमध्ये झाला होता. त्यामुळं परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. जिल्हा निवड समिती यावेळी परीक्षा घेईल. यंदा एकाच दिवशी परीक्षा पार पडतील. ही परीक्षा सुरळीत घेणार असल्याचं सांगत यावेळी गडबड होऊ देणार नाही, असंही महाजन म्हणाले.  


2019 उमेदवारी अर्ज भरणारांना सवलत


मार्च 2019 मध्ये अर्ज भरलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे वय निघून गेले आहे, त्यांना या परीक्षेत सूट देण्यात येणार आहे.  ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केले होते.  एकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी अर्ज केले होते.  यंदा तसे करता येणार नाही. एका वेळी एकच अर्ज करता येणार आहे. तसेच पूर्वी फॉर्म भरलेल्यांना पैसे परत मिळणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं. 


या पाच पदांच्या परीक्षा


आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ


ठाकरे सरकारच्या काळात आरोग्य भरती घोटाळा समोर 


राज्यात मागील ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण समोर आलं होतं. यामुळं परीक्षाच रद्द करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं आता उघडकीस आलं होतं. या प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालकांसह अनेकांना अटक करण्यात आली होती.