राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.  


शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश योजना' लागू होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती


राज्य सरकार याच शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू असेल.  मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा  आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. वाचा सविस्तर


माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, हिंदुजा रुग्णालयात दाखल


राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते.थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते. वाचा सविस्तर


नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या मुलीचे 'भावी आमदार' म्हणून झळकले होर्डिंग


मागील काही महिन्यांपासून माजी मंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसदार कोण यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. याच काळात चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे माजी मंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांचं नाव चर्चेत आलं होत. त्यातच आता नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग झळकले आहेत. वाचा सविस्तर


पीएमआरडीए मेट्रोसाठी इंजिनिअरची भरती करण्यासाठी चक्क पाटण्यामध्ये जाहिरात


पुण्यात होत असलेल्या पीएमआरडीए मेट्रोसाठी इंजिनीअरची भरती करण्यासाठी चक्क पाटण्यामध्ये जाहिरात काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पीएमआरडीए मेट्रोचे काम करणाऱ्या टाटा कंपनीकडून ही जाहिरात काढण्यात आली आहे. टाटा कंपनीच्या मते ही जाहिरात त्यांनी ज्या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे त्याने ही जाहिरात काढली आहे. त्याचबरोबर इंजिनीअरच्या या भरतीसाठी आधी पुण्यातही जाहिरात काढण्यात आली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही असा दावा टाटा कंपनीने केला आहे. मात्र पुण्यात जर ही जाहिरात काढण्यात आली होती तर ती कुठे आणि कधी प्रकाशित झाली होती हे मात्र टाटा कंपनीने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. वाचा सविस्तर


द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू 


नाशिक शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे. आज सकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. वाचा सविस्तर