Nanded News : मागील काही महिन्यांपासून माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा राजकीय वारसदार कोण यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. याच काळात चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे माजी मंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया (Shreejaya) यांचं नाव चर्चेत आलं होत. त्यातच आता नांदेडमध्ये (Nanded) श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग झळकले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस कोण याचीच चर्चा रंगली होती. त्यात श्रीजया चव्हाण याच अशोक चव्हाण यांच्या वारसदार असतील असं म्हटलं जात होतं. मात्र त्यावर अशोक चव्हाण यांनी राजकारणात तिने यावं का नाही हा तिचा निर्णय असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं.
वाढदिवसानिमित्त भावी आमदार आशयाचे होर्डिंग
गेल्या काही दिवसांत श्रीजया या वडील अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात दिसून आल्या होत्या. तर येत्या 26 मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने 'भावी आमदार' अशा आशयाचे शुभेच्छापर होर्डिंग नांदेड शहरात झळकलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होतेय हे नक्की.
भारत जोडो यात्रेतही श्रीजया यांचे बॅनर
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. या भारत जोडो यात्रेतील काँग्रेसच्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिचे देखील बॅनर झळकले होते. तसंच देगलूरपासून राहुल गांधींसोबत या पदयात्रेत श्रीजया चव्हाण चालत होत्या. श्रीजया चव्हाण यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. पोस्टरवरही त्यांचे फोटो दिसत होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला होता.
विधानसभा निवडणुकीत दोन्ही मुलींची महत्त्वाची भूमिका
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून लीलया सांभाळली. तसंच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडली आहे.
हेही वाचा
Ashok Chavan :अशोक चव्हाणांचा राजकीय वारस कोण? भारत जोडो यात्रेत चर्चेला उधाण