Heat Wave: गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा (Heat) पारा वाढतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचा फटका माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील बसतोय. तर वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Farm Business) अडचणीत आले असून, उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून, 50 कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र आहे. 


मागील काही दिवसात अंगाची लाही-लाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तापमान काही ठिकाणी 42 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. सोबतच याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील पाचोड, लिंबगाव, खादगांव, कडेठाणसह परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहेच, सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे. 


उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून पाचोड परिसरातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर गवत टाकले आहे. एवढेच नाही तर नारळाच्या फांद्याही अंथरल्या आहेत. तर आता पोल्ट्री फार्ममध्ये जागोजागी फोगर बसविले आहेत. जेणेकरुन वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे संरक्षण होईल. पण एवढं करूनही नुकसान हे सुरुच आहे. उलट यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून, हे प्रमाण 50 पर्यंत पोहचले आहे.


गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 ते 12 टक्क्यांनी मर वाढली


एकीकडे उन्हाचा पारा आणि दुसरीकडे वीजेच्या भारनियमनामुळे पाण्याला ताण पडतो. फॉगरसाठी ही पाणी उपलब्ध होत नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 ते 12 टक्क्यांनी मर वाढली असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक सांगतात. कंपनीकडून 5 टक्के मर ग्राह्य धरून व्यावसायिकांना मोबदला दिला जातो. मात्र, मर वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते, त्यामुळे कंपनीकडून पक्षांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यामुळे सध्या नैसर्गिक संकटा सोबतच कंपनी मुळेही पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. 


अशी काळजी घ्या...



  • उष्णतेपासून पक्षांची काळजी घेण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी शेडमध्ये फॉगरची सुविधा करणं गरजेचे आहे.

  • सोबतच शेडवर चुन्याचा लेप लावणे, शेडवर नारळाच्या झावळ्या किंवा गवताचे आच्छादन टाकणे गरजेचे आहे.

  • तसेच पोल्ट्री शेडमध्ये पंखा किंवा कुलर लावणे देखील गरजेचे आहे.

  • कोंबड्यांची होईल तेवढी उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे. 


उत्पन्न कमी आणि खर्च अधिक वाढला... 


अति उष्णतेने पक्षाचे वजन घटत आहे. दिवसा प्रचंड ऊन पडतं असल्याने या संमिश्र वातावरणाचाही परिणाम या पक्षावंर होत आहे. सकाळी 8 पासून ते दुपारी 4 पर्यंत फार उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी व शेतातील पिकांची हानी होत आहे. वाढणारी उष्णता प्रचंड असल्याने, कोंबडी पिल्ले फार नाजूक असतात त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळे दिवसभर पोल्ट्रीमध्ये फॅन लावणे, सतत शेडवर पाणी फवारणी करावी लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता कोंबड्यावर वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढला आहे. या समस्या निर्माण होत असल्यामुळे परिणामी कोंबड्यांचे वजन कमी भरत आहे. त्याचा आर्थित फटका बसत असल्याचे पोल्ट्री व्यवसायीक सांगत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik AC Poultry Farm : नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग, शेतात उभारला वातानुकुलित 'पोल्ट्री फार्म'