मुंबई : महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या मंत्रिमडळाचं खातेवाटप शनिवारी झालं आणि अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. त्याचंच आज दिवसभर सेलिब्रेशनही झालं. पण एक प्रश्न सुटला म्हणून आव्हानं संपली असं नाही. महायुती सरकारसमोर आता पालकमंत्रिपदाचं आव्हान उभं ठाकलंय आणि त्यातून महायुतीमध्ये संघर्ष निर्माण होवू शकतो.
आताच्या मंत्रिमंडळात अनेक काही जिल्ह्यांमध्ये तीन ते चार मंत्री आहेत. हे चार मंत्री जर एकाच पक्षाचे असते तर कदाचित जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा संघर्ष नसता. पण एकाच जिल्ह्यातून महायुतीतील दोन किंवा तीनही पक्षाचे मंत्री असतील तर संघर्षांची सर्वाधिक शक्यता आहे.
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा
नाशिकचं उदाहरण घ्यायचं झालं तर भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे चार मंत्री आहेत. मग यांच्यातील पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न पडला आहे. पण त्याचं उत्तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलं. जिल्ह्यात आमचे जास्त आमदार म्हणून पालकमंत्री आमचाच असेल असं ते म्हणाले.
नाशकात दादांच्या मंत्र्यानं दावा ठोकला तर रायगड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांनी दावा ठोकलाय. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले हे पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे हे मंत्री आहेत. आपणच पालकमंत्री होणार असा दावा या सर्वांचाच आहे.
पुण्यात अजितदादा की चंद्रकांतदादा?
अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये एन्ट्री घेत असतानाच पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन किती दबाव टाकला होता हे सर्वांनाच माहिती आहे. पालकमंत्री बदलला की जिल्ह्याचं राजकारण फिरतं हेही पुण्यातच दिसून आलंय. त्यामुळे आताही असंच होईल का? असा प्रश्न जेव्हा पडतो. पालकमंत्री त्या जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवर ठरत नाही तर अनुभवावरून ठरते असं भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. तर कोणताही दादा पालकमंत्री झाला तर चांगलंच होईल असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय.
अजितदादांच्या आधी चंद्रकांत दादांकडेच पुण्याचं पालकमंत्रीपद होतं. त्यामुळे आताही त्यांचं नाव शर्यतीत असेलही. सातारा जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात चार मंत्री आहेत. त्या प्रमाणात कुणाला पालकमंत्री द्यायचं या गोष्टी सोप्या नाहीत.
पालकमंत्रिपदावरून कुठे संघर्ष?
जिल्हा : ठाणे
एकनाथ शिंदे, शिवसेना
गणेश नाईक, भाजप
----------------------------
जिल्हा :जळगाव
गुलाबराव पाटील, शिवसेना
संजय सावकारे, भाजप
----------------------------
जिल्हा : बीड
पंकजा मुंडे, भाजप
धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : यवतमाळ
अशोक उईके, भाजप
संजय राठोड, शिवसेना
इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : सातारा
शंभुराज देसाई, शिवसेना
शिवेंद्रराजे भोसले, भाजप
जयकुमार गोरे, भाजप
मकरंद पाटील, राष्ट्रवादी
--------
जिल्हा :कोल्हापूर
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
प्रकाश अबिटकर, शिवसेना
असं असलं तरी अनेक जिल्ह्यांमध्ये कोणत्याही संघर्षाशिवाय पालकमंत्रीपद वाटप होईल अशी शक्यता आहे. कारण, अनेक जिल्हे असे आहेत जिथे एकच किंवा दोन मंत्री आहेत.
महायुतीतील मित्रपक्षांमध्ये संघर्ष कितीही मोठा असला तरी तो जगजाहीर होणार नाही याचीच काळजी घेतली आहे. त्यामुळेच लोकसभेत सपाटून मार खाणारी महायुती ऐतिहासिक विजयासह विधासभेत परतली. त्यातच जागावाटप ते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुन्हा एकच गोष्ट दिसली..ती म्हणजे Slow and Steady Wins the Race. आताही पालकमंत्र्यांच्या निवडीतही बहुतेक हाच फॉर्म्युला असू शकतो.
ही बातमी वाचा: