लातूर : गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्यांच मोबाईलवर एक व्हिडीओ फिरत आहे. त्यामध्ये बजाज अलायन्झ या विमा कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज आलायन्झवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने म्हटले आहे की, "महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांवर बजाज आलायन्झ या खासगी कंपनीचा विमा (इन्शॉरन्स) घेण्यासाठी दबाव आणला जात आहे." हा व्हिडीओ गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा धुमाकूळ घालत आहे.


कार्पोरेटपासून बँकिंगपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा उल्लेख या सहा मिनिटांच्या व्हिडीओमध्ये केला आहे. बँकेतून कर्ज देताना सोबत इन्शुरन्स पॉलिसी (विमा) घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला जातो. याबरोबरच बँकेचे मॅनेजर विदेशी पर्यटनाची हौस भागवण्यासाठी कर्जासोबत अशा पॉलिसी सक्तीच्या करतात, याचा भांडाफोड या व्हिडिओतून योगेश शेळके या तरुणाने केला आहे.

बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव या गावचा रहिवासी असलेल्या योगेश शेळके हा तरुण बजाज अलायन्झ या कंपनीमध्ये सीनियर रिलेशनशिप मॅनेजर म्हणून लातूर येथे काम करत होता. या कामातून त्याला आलेला अनुभव आणि वरिष्ठांनी काम करून घेण्यासाठी टाकलेला दबाव याचीच माहिती त्याने व्हिडीओद्वारे दिली आहे. त्याच्या व्हिडीओने राज्यात खळबळ उडाली आहे.

त्याच्या व्हिडीओनंतर 'माझा'च्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे रिजनल मॅनेजर ए. एन. गट्टाणी यांच्याशी बातचीत केली. गट्टाणी म्हणाले की, "बजाज अलायन्झशी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने टायअप केले आहे. कर्जासोबत पॉलिसी (विमा) काढल्या जातात. पाच वर्षांपासून बारा वर्षांपर्यंत वार्षिक प्रीमियम असलेल्या पॉलिसी असतात. बँकेच्या 80 शाखांमधून 400 शेतकऱ्यांना पॉलिसीज देण्यात आल्या आहेत. परंतु या पॉलिसींसाठी कोणावरही सक्ती केलेली नाही."

याबाबत योगेश शेळके म्हणाला की, लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडे कर्जाची मागणी केली होती. कर्ज घेताना बजाज अलायन्झची पॉलिसी घ्यावी लागेल अशी अट बँकेच्या मॅनेजरने शेतकऱ्यांना घातली होती.

पाहा व्हिडीओ : बळीराजावरच्या बळजबरीचा पर्दाफाश | बीड | एबीपी माझा