पुणे : युती नाही झाली तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालन्यात पराभव निश्चित असल्याचे भाकीत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले आहे. युती झाली नाही तर रावसाहेब दानवे दीड लाख मतांनी पडण्याची शक्यता काकडे व्यक्त केली आहे.

पिंपरीत काल भाजपची लोकसभा निवडणुकासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी दावा केला होता की, "आम्ही (भाजप)युतीशिवाय लोकसभा निवडणूक लढलो तर राज्यात लोकसभेच्या भाजपला चाळीस जागा मिळतील." त्यावर मग "युतीची गरज नाही ना?" असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी दानवेंना विचारला. त्यानंतर दानवे म्हणाले की, "ते आम्ही ठरवू, तुम्ही आमचा पक्ष चालवू नका."

दानवेंच्या या वक्तव्यानंतर आज खासदार संजय काकडेंनी दानवेंना घरचा आहेर दिला आहे. काकडे म्हणाले की, "कोणत्या आधारावर दानवेंनी हा दावा केला आहे, हे मला माहीत नाही. मी स्वतः एक सर्वेक्षण केले आहे. त्यामधून हे स्पष्ट होते की, युतीशिवाय रावसाहेब दानवे दीड लाख मतांनी पडतील. दानवेंच्या मतदार संघात माझे चांगले संबंध आहेत. तिथल्या लोकांशी माझे बोलणे होत असते. त्यामुळे मला तिथली परिस्थिती माहीत आहे.

मी पक्ष सोडणार नाही : संजय काकडे
मागील काही दिवसांपासून मी शरद पवार आणि इतर पक्षांमधील नेत्यांची जरी भेट घेतली असली, तरी मी माझा पक्ष सोडून जाणार नाही, असे काकडे यांनी स्पष्ट केले आहे.