Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी गावागावात जोरदार प्रचार सुरुय. मात्र यावेळी राज्यातील तीन चर्चित गावात देखील निवडणूक होत असल्यानं या गावांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मागच्या तीस वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या हिवरेबाजारमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे तर अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे आणि भास्कर पेरे पाटील यांच्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत आता पेरे पाटील नसणार आहेत.


छोट्याशा गावाच्या विकास कामांमुळे राज्यात नव्हे तर देश आणि विदेशात पोहोचलेले आदर्श गाव हिवरे बाजार. तीस वर्षांपासून पोपटराव पवार हे याच हिवरेबाजार गावाचा आदर्श राज्य आणि देशाला सांगत होते आता मात्र ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पोपटराव पवारांच्या कामाची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली आहे. मात्र त्यांना या निवडणुकीत यश येतं की नाही हे आता पाहावं लागणार आहे.


Maharashtra Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले, देऊ लागले लाखोंच्या ऑफर्स 


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण-सिद्धीतील विकासाचे काम पाहायला आजही या गावात लोक दुरुन येतात. इथल्या विकासाचा रोल मॉडेल राज्यभर पसरलं. मात्र आता त्याच राळेगण सिद्धीमध्ये निवडणुकीची धामधूम पाहायला मिळतेय. 9 जागांपैकी केवळ 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 7 जागांवर यंदा निवडणूक होणार आहे.


गेल्या पंचवीस वर्षांत पासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्कर पेरे यांनी गावच्या राजकारणातून आता निवृत्ती घेतलीय. पाटोद्यात निवडणूक व्हायची पण पेरे निर्विवाद बाजी मारायचे. मात्र यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही. आता पुढच्या पिढीला संधी द्यायची म्हणून आपण बाजूला झाल्याचे पेरे पाटील सांगत आहेत.


संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात ज्या गावांकडे विकासाच्या मार्गावरील दीपस्तंभ म्हणून पाहतो. या तीनही गावातील रंग आता बदलत चालले आहेत. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार आणि पाटोदा या गावात कैकदा विकासाच्या मुद्द्यावर बिनविरोध होत होती. आज या तीनही गावात सत्तासंग्रामाचं महाभारत रंगलं आहे.


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द


नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली गेल्या. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी झाली. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेतली गेली. त्याचदिवशी निवडणूक चिन्ह वाटप झाली आहे. आता मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.


25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.