पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अखेर विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलं आहे. एमपीएससीने याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये आयोजित परीक्षांचं सुधारित वेळापत्रक 7 सप्टेंबर 2020 च्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार 11 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा प्रस्तावित होती. पण सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. यासोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षाही पुढे ढकलल्याचं प्रसिद्धीपत्रक 13 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलं होतं.




  • राज्य सेवेची पूर्व परीक्षा जी 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार होती ती आता 4 मार्च 2021 ला होईल.

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा जी 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार होती ती आता 27 मार्च 2021 रोजी होईल.

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठीची एकत्रित पूर्व परीक्षा जी 22 नोव्हेंबर 2020 रोजी होणार होती ती आता 11 एप्रिल 2021 रोजी होईल.



दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाच्या परिस्थितीचा सरकारकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाचा अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसंच याबाबतची माहिती आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी नियमित वेबसाईटवर भेट देणं उचित ठरले, असं आयोगाने आपल्या प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे.