मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील 14 हजारांहून अधिक गावांच्या आखाड्यात निवडणुकीचा जंगी सामना सुरु झालाय. दरम्यान ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावताना दिसत आहेत. गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध करा मग लाखोंचा निधी देऊ अशा फर्मास ऑफर्स आमदार आणि लोकप्रतिनिधी देऊ लागलेत. बरं त्यांच्या या आवाहनाला बऱ्यापैकी पाठिंबा देखील मिळत आहे. महाराष्ट्रातील जवळपास 12 आमदारांनी ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि लाखोंचा निधी घ्या, अशा घोषणा केल्यात. मात्र हा निधी आमदार मंडळी स्वत:च्या खिशातून देणार का? असा सवाल केला जात आहे. कारण या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला तर आमदार निधी निश्चितच पुरणार नाही.


पारनेर तालुक्यातील 30 ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचा निर्णय
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या आवाहनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. कारण पारनेर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावागावात वाद-विवाद, भांडण होऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवली. "ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा" असे लंके यांनी आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील तब्बल 30 गावातील ग्रामपंचायतने बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर आणखी 10 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणार असल्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.


आमदार निलेश लंकेंची भन्नाट आयडिया, पारनेरमधील 30 ग्रामपंचायती बिनविरोध 


बीडच्या आष्टी मतदारसंघातील ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतील अशा गावांना आगामी काळात प्रत्येकी 21 लाखाचा विकास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. आष्टी मतदारसंघात 23 ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. आ. बाळासाहेब आजबे यांनी देखील बिनविरोध निवडणूक घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आगामी पाच वर्षांच्या काळासाठी प्रत्येकी 21 लाख रुपये विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यातील 10 लाखांचा निधी आमदार निधीतून तर 11 लाखांचा निधी कंपनी विकास निधीतून ( सीएसआर फंड ) देण्यात येणार असल्याचे आजबे यांनी सांगितले.


अक्कलकोट तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणुका घेतल्यास कोरोनाची प्रभाव ग्रामीण भागात वाढू देखील शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी चर्चा करुन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्यांना विकासनिधीतून 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देखील यावेळी सचिन कल्याणशेट्टी यांनी दिले आहे.


कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी निवडणूक काळात कोरोनाचा फैलाव होऊ नये. कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर अधिकचा ताण येऊ नये , गावामधील राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडाव्यात असे आवाहन मतदारसंघात केलंय. ज्या ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध करतील त्या ग्रामपंचायतीला 25 लाखांचा विकास निधी देईन अशी घोषणा केलीय.


जालना : बिनविरोध ग्रामपंचायत करणाऱ्या ग्रामपंचायतींना 20 लाखांचा आमदार फंडातून निधी देणार असल्याची घोषणा भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलीय. ग्रामपंचायत निवडणुकीत गावोगाव होणारे वाद तंटे लक्षात घेता ज्या ग्रामपंचायती सामंजस्याने बिनविरोध निवडणुका करतील अशा ग्रामपंचायतींना आपल्या आमदार फंडातून विकासाठी 20 लाखांचा निधी देऊ अशी घोषणा नारायण कुचे यांनी केलीय. जालना जिल्ह्यात एकूण 475 ग्रामपंचायती साठी मतदान होणार असून बदनापूर तालुक्यात एकूण 80 ग्रामपंचायती आहेत.


नाशिक: ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर मी माझ्या आमदार निधीतून अथवा इतर शासन निधीतून 25 लाख निधी देईल. माझ्या मतदारसंघातील 25 ग्रामपंचायतींना मी हे आवाहन केले आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात कुठलेही वाद होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतलाय असं नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी म्हटलं आहे.


या आमदारांनी केलीय लाखोंचा निधी देण्याची घोषणा
पारनेर - निलेश लंके
कल्याण पूर्व- गणपत गायकवाड
अकोले - डॉ किरण लहामटे
परभणी - डॉ राहुल पाटील
आष्टी - बाळासाहेब आजबे
बदनापूर - नारायण कुचे
हातकणंगले- राजू आवळे
अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
शिरोळ - राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
लोहा कंधार- श्यामसुंदर शिंदे
देवळाली- सरोज अहिरे
मोर्शी- देवेंद्र भुयार


ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि एक लाखाचे बक्षीस मिळावा, अभिजित पाटील यांची घोषणा
एका बाजूला अजूनही राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नसताना सध्या सुरु झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कोरोनाचा धोका टाळून गावाची एकी मजबूत करण्यासाठी एका तरुण खाजगी साखर कारखानदाराने तालुक्यातील गावांना बिनविरोध निवडणूक करून एक लाखाचे बक्षीस मिळवण्याच्या अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असलेले आणि केवळ 38 वयाचे असलेल्या अभिजित पाटील यांचे उस्मानाबाद येथे धाराशिव साखर कारखाना, नाशिक येथे वसंतदादा पाटील सह साखर कारखाना तर नांदेड येथे DVP वेंकटेश्वरा साखर कारखाना असे तीन कारखाने असून प्रत्येक कारखाना चांगल्या रितीने चालवला जात आहेत. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष जर एकत्रित सरकार चालवत असतील तर याचा आदर्श पंढरपूर तालुक्यातील गावांनी घेऊन गावातील एकी भक्कम करीत बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करावी असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे. ज्या गावात बिनविरोध ग्रामपंचायत होईल, त्या प्रत्येक गावाला एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केली आहे. आता याला पंढरपूर तालुक्यातील गावगाड्यातील जनता कशी प्रतिसाद देते हे लवकरच समोर येणार असले तरी किमान यामुळे गावातील गट तट संपून एकी भक्कम झाल्यास गावाचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास सुरुवात होईल.


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द


नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.