Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : शिवरायांनी वापरलेले वाघनखं लंडनमधील म्युझियमशी करार करून महाराष्ट्रात परत आणण्यात येत आहेत. या गोष्टीमुळे शिवभक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण असून त्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केलं जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत करण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर्सही लागले आहेत. त्याची सुरूवात लंडनमधून झाली असल्याचं दिसून येतंय. मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) हिने तिचा लंडनमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये वाघनखांच्या संबंधित पोस्टर झळकल्याचं दिसून आलं
मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने तिचा लंडनमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओमध्ये मागे एक पोस्टर दिसतंय. त्या पोस्टरवर मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो दिसतोय. त्या खाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो दिसतोय. त्या पोस्टरमध्ये मोठ्या अक्षरातील वाघनखं (Wagh Nakh) हे ठळक अक्षरात लिहिलेलं दिसतंय.
राज्य सरकारचे लंडनमधील म्युझियमशी करार केला आणि वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतः लंडनमध्ये गेले होते. आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारला जमलं नसलेलं काम हे या सरकारने केलं आहे, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण आहे. ही वाघनखं महाराष्ट्रात 16 नोव्हेंबर रोजी आणण्यात येणार आहेत.
वाघनखांवरून वाद
राज्य सरकारने वाघनखं लंडनमधून परत आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर मोठी चर्चा सुरू झाली. ती वाघनखं नेमकी शिवरायांनी वापरलेली होती की शिवकालीन आहेत याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनीही ती वाघनखं शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी वापरली नव्हती, ती साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना दिलेली होती अशी माहिती दिली.
लंडनमधील ज्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखं आणण्यात येणार आहेत त्या संग्रहालयाने करार करताना काही अटी समोर ठेवल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे,
- ही वाघनखं कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत.
- या वाघनखांचे इन्शुरन्स काढण्यात यावं. जेणेकरून त्याची चोरी होऊ नये.
- या वाघनखांच्या सुरक्षेसंबंधित काय उपाययोजना करण्यात येणार आहे त्या सांगाव्यात. त्याच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी.
ही बातमी वाचा: