मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कितीही खोटारडेपणाचे आरोप केले तरी जनतेला सगळं माहित आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही ओळख मी जाऊ देणार नाही. बाळासाहेबांच्या मुलावर पहिल्यांदा कोणीतरी खोटेपणाचे आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात नेमकी काय चर्चा झाली होती, याची माहिती उद्धव ठाकरेंनी आज उघड केली. लोकसभा निवडणूकच्या वेळी अमित शाह माझ्याकडे आले होते, मी गेलो नव्हतो. उपमुख्यमंत्री पद मिळेल, अशी ऑफर त्यांनी मला दिली होती. मात्र मी त्यासाठी लाचार नाही असं उत्तर दिलं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार असं वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलं होतं. मला अमित शाह यांचा फोन आला, मला 50:50 चा फॉर्म्युला हवा हे मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता, आमचा मुख्यमंत्री झाला तर आम्ही सांभाळून घेऊ, तुमचा झाला तर तुम्ही सांभाळून घ्या.
गोड बोलून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला
अमित शाह म्हणाले, माझ्या काळात आपलं नातं बिघडलं, माझ्याच काळात ते मी दुरुस्त करेन. यावेळी त्यांनी गोड बोलून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. मात्र युतीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबद असं काही ठरलं नव्हतं, असं जर तुम्ही सांगत असाल तर मी शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
भाजपला शत्रूपक्ष मानत नाही
केंद्रात आम्हाला 2014 ला अवजड उद्योग खातं दिलं. 2019 साली पुन्हा तेच खातं आमच्या गळ्यात मारलं. काहीतरी करतो असं म्हटलं होतं, मात्र अजूनही करत आहेत. भाजपला मी शत्रूपक्ष मानत नाही. शब्द देऊन फिरवणारी ही वृत्ती आमची नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.
शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत न घेता, सरकार तुमचंच येणार असं तुम्ही म्हणत असाल, तर ते कोणाच्या जीवावर येणार हे सांगावं. जर तुमच्यासाठी पर्याय खुले आहेत, तर मी माझ्या पर्यायांचा विचार केला तर आरोपी का बनवता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. मी त्यांच्याशी फोनवर बोललो नाही, हो ते खरं आहे. भाजपने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. राष्ट्रवादीसोबत आम्ही चोरुन लपवून बोलत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
'एबीपी माझा'ची युट्यूब लाईव्ह लिंक