मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भाजपने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भाजपच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
शिवसेनेने सर्व पर्याय खुले असल्याच्या भूमिका सर्वात आधी घेतली. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी एकदाही फोन घेतला नाही. शिवसेनेने आमच्याशी चर्चा करण्याऐवजी रोज काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली. आमच्याशी चर्चा न करण्याचं धोरण चुकीचं आहे, अशी शिवसेनेनेबद्दल उघड नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. समज-गैरसमज चर्चेतून दूर होऊ शकतात. जितके घाव विरोधकांनी केले नाहीत, तितके घाव शिवसेनेनं केले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.
शिवसेना ज्या भाषेत बोलत आहेत, त्या भाषेत आम्हीही उत्तरं देऊ शकतो. मात्र आम्ही आमची मर्यादा कधीही ओलांडली नाही. शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची टीका विखारी होती. मात्र आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरेंबद्दल कधीही चुकीचं वक्तव्य केलं नाही. बाळासाहेब आमच्यासाठी पुजनीय आहेत. तसेच उद्धव ठाकरेंवरही आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.
गेल्या 15 दिवसांपासून मीडियापासून दूर असलेले देवेंद्र फडणवीस आज राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा मीडियासमोर आले. यावेळी शिवसेनेबद्दल मनातील खदखद फडणवीस यांनी बोलून दाखवली.