मुंबई : महाराष्ट्र सरकारने व्हीआयपी नेत्यांसाठी तब्बल 225 कारसह एक बुलेटप्रूफ टोयोटा फॉर्च्युनर कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बुलेटप्रुफ कारची किंमत तब्बल 56 लाख एवढी आहे. ही कार केंद्रीय मंत्र्यांच्या नक्षलग्रस्त भागातील दौऱ्यांसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे ही कार नागपूरच्या प्रोटोकॉल विभागाकडेच राहणार आहे.

गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितेने या वाहन खरेदी प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या निर्णयाला हिरवा कंदिल दिला आहे. यासंबंधीचा जीआर देखील सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने खरेदी केलेल्या बुलेटप्रूफ कारची किंमत 55,86,000 रुपये एवढी आहे.

जिल्ह्यात भेट द्यायला येणाऱ्या अति महत्वाच्या व्यक्ती आणि इतर मान्यवरांसाठी 225 कार खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यामधील 22 कारचा ताबा हा नागपूरच्या प्रोटेकॉल विभागाकडे असणार आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2016 मध्येही महाराष्ट्र सरकारने 40 लाख रुपये किंमतीच्या दोन कार खरेदी केल्या होत्या. या गाड्या पालघर जिल्ह्याच्या मंत्री आणि नेत्यांसाठी खरेदी करण्यात आल्या होत्या. पण यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. एकीकडे पालघरमध्ये कुपोषणासारखा मोठा प्रश्न आ वासून उभा असताना सरकार लाखो रुपये गाड्यांवर का खर्ची घालतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, आता महाराष्ट्र सरकारने तब्बल 225 गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याने विरोधक याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.