Maharashtra government staff strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस; रुग्णसेवेला मोठा फटका.. सरकारी कार्यालयांमधलं कामकाज ठप्प

Maharashtra government staff strike: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. सर्वसामान्य जनतेला या संपाचा जबर फटका बसतोय.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Mar 2023 12:38 PM
 Beed Strike: बीड जिल्ह्यातील महसूल विभागात काम करणाऱ्या 818 जणांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस

 Beed Strike: जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी संप करत आहेत. या संपामध्ये सहभागी झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांना बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस काढली आहे. या नोटीसीद्वारे या सगळ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये महसूल विभागात काम करणाऱ्या गट क आणि गट ड अशा जिल्हाभरातील 818 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र अद्याप या नोटिशीला कुठल्याही कर्मचाऱ्यांनी उत्तर दिलेले नाही अथवा कोणी कामावर हजर झालेलं नाही. 

Pune Strike:  पुण्यातील जी एस टी कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी

Pune Strike:  पुण्यातील जी एस टी कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.  काम बंद करून हे कर्मचारी जी एस टी भवनच्या समोर घोषणाबाजी करत आहेत  सरकारने आमच्या पेन्शनचे पैसे खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवल्याने आमच्या हक्काच्या पैसे परत मिळतील याची खात्री राहणार नाही.  त्यामुळे जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी  कर्मचारी करत  आहेत.  

Mumbai College Strike:  मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना संपामध्ये सहभागी

Mumbai College Strike:  मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सहभागी झाले आहेत. के जे सोमय्या महाविद्यालयातील जवळपास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले असून या महाविद्यालयाच्या परिसरात या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठी रॅली काढली आहे. संप काळात सर्व वर्ग बंद करण्यात आले आहे. संपकाळात बारावी बोर्ड पेपर तपासणीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला असून निकाल उशिरा लागल्यास याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल अशा प्रतिक्रिया प्राध्यापकांकडून देण्यात आले आहेत. जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत संप मागे नाही असा पवित्रा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला आहे

  Uddhav Thackeray on Strike: महाशक्ती पाठीशी असताना भार वाढण्याची सरकारला काय चिंता? जुन्या पेन्शनवरुन ठाकरेंचा टोला

  Uddhav Thackeray on Strike:  पेन्शनवरून राज्यभर सुरु असलेल्या संपावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाशक्ती पाठीशी असताना भार वाढण्याची सरकारला काय चिंता?' असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला दिला आहे. 


 





Maharashtra government staff strike: प्राथमिक शिक्षक संघाची संपातून माघार

Maharashtra government staff strike: प्राथमिक शिक्षक संघाची संपातून माघार घेतली आहे.   सरकार मागण्या मान्य करण्यास तयार असेल तर संप कशासाठी? असा सवाल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केला आहे. 

 Nandurbar News: सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका शेतकऱ्यांना

 Nandurbar News: नंदुरबारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने पंचनाम्यांना ब्रेक लागला आहे.  लवकरात लवकर पंचनामे करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Mumbai J J Hospital Strike:  मुंबईतल्या जे जे रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात केस पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगा

Mumbai J J Hospital Strike:  सध्या राज्यभरात पेन्शनच्या मुद्द्यावरुन कर्मचारी वर्ग संपावर गेलाय. याचाच परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होताना देखील दिसतोय. मुंबईतल्या जे जे रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात केस पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळतंय.


 


Amravati News: संपामुळे परीक्षेच्या तोंडावर शाळेला कुलूप...

Amravati News:  जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.. या संपामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक शाळांना कुलुप लागले आहे. परीक्षेच्या तोंडावर शाळेला कुलुप लागल्याने विद्यार्थ्यांचं मात्र मोठं नुकसान होतंय..

Pune Strike:  ससून रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची भली मोठी रांग

Pune Strike:  संपाचा परिणाम पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर दिसून आला. या रुग्णालयात राज्याच्या वेगवेगळ्या भागातून रुग्ण उपचारांसाठी येत असतात. मात्र अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्यावर देखील संपामुळे मुख्य डॉक्टर रुगाणला तपासण्यासाठी अद्याप आलेलेच नाहीत अशी व्यथा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीहून आलेल्या कुटुंबाने व्यक्त केली.  तर ससून रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची भली मोठी रांग पाहायला मिळत आहे. परिचारिका आणि इतर स्टाफ संपात सहभागी झाल्याने ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्या रुगाणांकडे लक्ष दिले जात नसल्याच नातेवाईकांच म्हणणे आहे. 

Solapur Strike: संपामुळे सोलापूर रुग्णालयातील 23 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

Solapur Strike:  जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे.  सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ सोलापूरच नाही तर उस्मानाबाद, लातूर शिवाय कर्नाटकातून देखील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील  350 स्टाफ नर्स, 110 मामा-मावशी, 110 क्लार्क आणि शिपाई संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे रुग्णालयातील 23 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. 

Nagpur Strike: नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये संपाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णसेवेवर विपरीत परिणाम

Nagpur Strike: नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये संपाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णसेवेवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. काल दिवसभरात दीडशे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रिया आणि उपचार केले जात आहेत. 


 


Ratnagiri Strike:  संपाचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णसेवेवर परिणाम

Ratnagiri Strike:  जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णसेवेवर परिणाम दिसून आला.. मात्र या संपाचा रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला नसल्याचा दावा रत्नागिरीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांनी केलाय.  50 टक्के स्टाफ कंत्राटी असल्यामुळे परिणाम झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय..

CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR Strike: घाटी रुग्णालयातील 20 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR Strike: छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम पाहायला मिळतोय. घाटी रुग्णालयातील 20 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यात. 

Solapur Strike :  सोलापूर शासकीय रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड

Solapur Strike :  जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाचा फटका राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांना बसतोय. सोलापूर शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः व्हील चेअर, स्ट्रेचरवरुन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात आणावं लागत आहे. मनुष्यबळाअभावी दैनंदिन शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आलीये. 

पार्श्वभूमी

मुंबई :  जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. सर्वसामान्य जनतेला या संपाचा जबर फटका बसतोय. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये तर अतिशय बिकट अवस्था आहे. नर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारीही संपात सहभागी असल्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणीची कामं ठप्प आहेत. सरकारी कार्यालयांची स्थितीही फारशी वेगळी नाही. ज्यांना तातडीची कामं आहेत त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये सारखे हेलपाटे मारावे लागत आहेत.. अधिकाऱ्यांकडे गेलं तर कर्मचारीच नसल्यानं तुमची फाईल कोण काढणार असं उत्तर मिळतंय.. मुळात, खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कर्मचारी संप कायम ठेवण्यावर अडून बसेल आहेत.  


राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शासकीय कार्यालये ओस पडली. दिवसभर शासकीय कार्यालयातील कामे ठप्प होती. संपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवदेन केले. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले.


समितीमध्ये कोणाचा समावेश?


शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी काल विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे जाहीर केले. समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. लेखा व कोषागारे संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.  समिती तीन महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस, अहवाल सादर करणार आहे. 


 अधिकाऱ्यांचा पाठिंबा, कोणतीही कारवाई करणार नाही


राज्य सरकारने जर आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 28 मार्चपासून राज्यातील दीड लाख राज्यातील राजपत्रित अधिकारी संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला राजपत्रित अधिकाऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा असून कर्मचारी संपावर गेल्यास अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याची भूमिका आहे. परिणामी राज्यातील शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


CM Eknath Shinde : जुन्या पेन्शनच्या मागणीचा तिढा सुटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.