Maharashtra government staff strike: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आजपासून संपावर

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी संप करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यभरातील लाखो कर्मचारी संपावर आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Mar 2023 04:58 PM
Prakash Ambedkar: जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा: ॲड. प्रकाश आंबेडकर 

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यभर सरकारी कर्मचारी आंदोलन करत असताना त्याला वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली. बंद करते वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की वीस वर्षानंतर याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होतील. आज ते परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्याने जुनी पेन्शन स्कीम सुरू करावी म्हणून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. पेन्शन चालू झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला यामुळे काँग्रेस पक्षाचेही आम्ही अभिनंदन करतो. पेन्शन स्कीम लागू झाली पाहिजे यासाठी आपण लढताय त्याबद्दल पक्षाच्या वतीने शुभेच्छा!"

Ahmednagar: जुन्या पेन्शनसाठी अहमदनगरमध्ये कर्मचाऱ्यांचा मोर्चा 

राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी आजपासून बेमुदत संप सुरू केल आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांच्या वतीने जिल्हा परिषद प्रवेशद्वारात ठिय्या देत एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भाषणे झाली. कोणत्याही परिस्थितीत पेन्शन मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा निर्धार यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.  यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहमदनगर शहरातून रॅली काढली. संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांसह शिक्षक, परिचारिका आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव धुडकावत सरकारी, निमरसकारी कर्मचारी आज संपावर गेले. सरकारी-निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर असे जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले.

Yavatmal : ज्यांना शिक्षणाची अट नाही त्यांना का पेन्शन? आरोग्य संघटनेचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ज्यांना शिक्षणाची अट नाही अशा लोकप्रतिनिधींना पेन्शन देण्यात येते, आम्ही तर शासकीय सेवेत 30 ते 35 वर्षे काम करतो तरीपण पेन्शन का नाही तो तर आमचा हक्क आहे. आमचा हक्काचा पैसा शासन म्युचल फंड, शेअर्स मार्केटमध्ये टाकते आणि अदानी सारखे लोक ते घेऊन पळतात असं या संघटनेनं म्हटलं आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमची महाराष्ट्र सरकारी कर्मचारी महासंघ स्थापन केली आणि म्हणूनच आम्ही भगवी टोपी घालून हे आंदोलन करीत आहोत असं या आंदोलकांनी म्हटलं आहे.

Maharashtra government staff strike: कोकण भवनमध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासाठी काम बंद आंदोलन

नवी मुंबई कोकण भवन कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन मागणी संदर्भात व इतर मागण्या संदर्भात बेमुदत संप पुकारलेला आहे. याबाबत राज्य शासनाला पूर्वकल्पना असूनही काल सुकानू समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आजपासून राज्यातले जवळपास 17 लाखाहून अधिक कर्मचारी संपामध्ये उतरले असून हा संप शंभर टक्के यशस्वी झालेला आहे. त्याचबरोबर या संपाला अधिकारी महासंघाचा देखील पाठिंबा आहे. जर हा संप असाच कायम राहिला तर दिनांक 28 मार्चपासून सर्व अधिकारी वर्ग महासंघ या संपामध्ये सामील होणार आहेत.

Washim Strike : वाशिम जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा

Washim Strike :  राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज वाशिम जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आरोग्य विभागानेही या संपात सहभाग घेतल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळित झाली आहे. संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात काही कर्मचाऱ्यांनी टरबुजाला टोपी घालून अशी कशी पेन्शन देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देण्यात आला आहे

Thane Strike: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी

Thane Strike: जुन्या पेन्शनसाठी सर्व कर्मचारी एकजुटीने संपामध्ये सामील झाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारोच्या संख्येने कर्मचारी निदर्शन करत आहेत. जुनी पेन्शन जोपर्यंत लागू करत नाही तोपर्यंत सुरूच राहणार यामुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे.  सरकार जोपर्यंत जुनी पेन्शन लागू करणार नाही तोपर्यंत असाच संप सुरू राहणार असल्याचा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे 

Yavatmal Strike:  बेमुदत संपामुळे शासकीय कार्यालय ओस

Yavatmal Strike:  जिल्ह्यातील 40 हजार कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जवळपास 40 हजार विविध शासकीय, निमशासकीय, आरोग्य कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, कृषी विभाग शिक्षण विभाग, तहसील कार्यालय, जिल्हा परिषदेचे विविध विभाग ओस पडले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे तर कृषी विभागात शेतकऱ्यांना सुद्धा परत जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात आधी तलाठी मंडळ अधिकारी यांचा संप होता त्यामुळे शेतकऱ्यांचे तूर व चना खरेदीची नोंदणी रखडली होती तर आता या संपामुळे सुद्धा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम पडणार आहे.  

Wardha Strike: वर्ध्यात 11 हजार कर्मचारी संपावर, जुन्या पेन्शनसाठी काढला मोर्चा

Wardha Strike: वर्ध्यात जुन्या पेन्शन मागणीसाठी 11 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्र येत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे. विविध विभागातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. एकच मिशन जुनी पेन्शन ही घोषणा करून जुन्या पेन्शनची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंबेडकर चौक येथून मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चा छत्रपती शिवाजी चौक, बडे चौक, बाजाज चौक मार्गे झाशी राणी चौकात पोहचला. या मोर्चात महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

 Bhandara News: राज्य सरकारच्या विरोधात भंडाऱ्यात रस्त्यावर उतरले कर्मचारी

 Bhandara News: जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या आवाहनानुसार भंडारा जिल्ह्यातील सुमारे 15 हजार पेक्षा अधिक सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य यंत्रणा संपात सहभागी झाले आहेत. या संपाला विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळं शासकीय कामे ठप्प झाल्याचं चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात  जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांची दुचाकी रॅली
Yavatmal News: यवतमाळ  जिल्ह्यातील 40 हजार कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जवळपास 45 वर विविध शासकीय, निमशासकीय संघटनाच्या वतीने शासनाचे लक्ष वेदण्यासाठी आझाद मैदान येतून  भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकाच मिशन जुनि पेन्शन ही घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत शासन जुन्या पेन्शन योजनेवर निर्णय घेणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात 15000 कर्मचारी संपावर

  Ratnagiri News: एकच मिशन जुनी पेन्शनसाठी राज्य प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यातल्या सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या मनुष्यबळाची कमी जाणवत आहे. जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयासमोर कर्मचारी एकत्र गोळा झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर माघार नाही अशी भावना हे कर्मचारी बोलून दाखवत आहेत. जिल्ह्यात 15000 कर्मचारी संपात सहभागी झाले असून आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलीस आणि होमगार्ड  यांची देखील मदत घेतली जाणार आहे. 

Hingoli News: हिंगोलीत पेन्शन लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Hingoli News:  जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. जिल्ह्यातील 23 कर्मचारी संघटनांनी या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. तापत्या उन्हात कर्मचाऱ्यांनी हा मोर्चा काढला या मोर्चात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले. 

Buldhana Strike: बुलढाणा जिल्ह्यातील 28 हजार 800 कर्मचारी संपावर; आरोग्य व्यवस्था, जनसेवा विस्कळीत

Buldhana Strike: जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 28 हजार आठशे कर्मचारी संपावर गेल्याने पूर्ण व्यवस्था ठप्प झाली आहे त्यामुळे जन सेवा ही विस्कळीत झाली आहे.या संपामध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने आरोग्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे .जिल्हाधिकारी कार्यालयातील साडेआठ हजार कर्मचारी आरोग्य विभागातील पाचशे कर्मचारी, जिल्हा परिषद विभागातील पंधरा हजार कर्मचारी संपावर गेले आहे त्यामुळे जनसेवेवर मोठा परिणाम दिसून येत आहे तसेच नगरपालिकेतील साडेपाच हजार कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधे पासून वंचित राहावे लागत आहे, जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत राहणार असल्याचे संपकऱ्यांनी  सांगितले आहे.

 Maharashtra News:  28 मार्चपासून राज्यातील दीड लाख राज्यातील राजपत्रित अधिकारी संपावर जाणार, शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प
 Maharashtra News:  28 मार्चपासून राज्यातील दीड लाख राज्यातील राजपत्रित अधिकारी संपावर जाणार आहे. त्यामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.  कर्मचाऱ्यांच्या संपाला राजपत्रित अधिकाऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा असून कर्मचारी संपावर गेल्यास अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याची भूमिका आहे. 

 
जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांचा एल्गार, परभणी जिल्ह्यातील 60 विभागांचे 12 हजार कर्मचारी संपावर

Parbhani Strike: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी आज राज्यभरातील विविध 60 विभागांच्या कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. या संपाला परभणीत सुरुवात झाली असून विविध 60 विभागांचे तब्बल  तब्बल 12  हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल कर्मचारी संघटनेने जोरदार निदर्शन केली आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णलयात परिचारिकांनी आंदोलन सुरु केले आहे प्रत्येक शासकीय विभागात आज आंदोलन करून संप पुकारण्यात आलाय. या संपांमुळे महसूल,आरोग्य, भूमी अभिलेख, कृषी आदी कार्यालतील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे..जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार या आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 

 Dhule Strike : धुळे जिल्ह्यातील 9500 कर्मचारी मध्यरात्री पासून संपावर
 Dhule Strike : धुळे जिल्ह्यातील 9 हजार 500 कर्मचारी संपात सहभागी झाले  असून आज सकाळी जिल्हा परिषदेत जमत कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली तरी आम्ही मागे हटणार नाही भले आंदोलन 50 दिवस लागले तरी चालेल कुठल्याही परिस्थितीत जुनी पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. संपात सहभागी होणारे कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेले आहेत. यामुळे राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची व्हीसी घेण्यात आली. संप कालावधीत प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार यासाठी नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्या असून त्यांना मात्र संपात सहभागी होता येणार नाही.
Thane News:  ठाणे जिल्हा रुग्णालय परिसरात आंदोलनाला सुरुवात, सरकारच्या विरोधात निदर्शने

Thane News:  जुन्या पेन्शनसाठी आता ठाण्यात देखील आंदोलनास सुरुवात झाली आहे.  आजपासून सुरू झालेल्या आंदोलनात ठाणे जिल्हा रुग्णालय परिसरात  सरकारच्या विरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू आहे. या संपत नर्स ,वॉर्ड बॉय आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागणी मान्य झाली नाही तर  बेमुदत संप सुरू राहणार आहे 

Beed News: बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

Beed News: जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यभरातील प्रशासकीय सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहे. यामध्ये बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशासकीय कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ही लोकं काम करत असतात मात्र जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील या कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारला आहे.. त्यामुळे या कार्यालयात चालणाऱ्या प्रशासकीय काम बंद झालं आहे

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा संप, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी
Ulhasnagar Strike:  उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या या संपात रुग्णालयातील नर्सेससह चतुर्थ श्रेणी कामगार सहभागी झाले आहेत.  उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या नर्स, सफाई कामगार, तांत्रिक कर्मचारी अशा 100 कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या एकूण 14 मागण्या असून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे आणि 15 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेणे या त्यातल्या प्रमुख दोन मागण्या आहेत. या संपामुळे रुग्णांचे हाल होणार नसून त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संपकरी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं आता या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देतं का? हे पाहावं लागणार आहे.
 Dharashiv:  धाराशिवमध्ये कर्मचाऱ्यांनी बोंब मारून केला सरकारचा निषेध

 Dharashiv:  धाराशिवमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज राज्यातील कर्मचारी संपावर असताना महिला कर्मचाऱ्यांनी फुगडीवर ताल धरून कर्मचाऱ्यांनी संबळाच्या तालावर ठेका धरलाय या कर्मचाऱ्यांनी बोंब मारून या सरकारचा निषेध केला आहे

Akola News: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला अकोला जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद

Akola News: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला अकोला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे. संपामुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याने नागरिकांचे हाल होत आहे. कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरूवात झाली असून मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Mumbai Strike :  मुंबईतील जीएसटी भवनाच्या कामाला कर्मचारी संघटनेच्या संपाचा फटका, जीएसटी भवनातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Mumbai Strike :  मुंबईतल्या माझगावच्या वस्तू व सेवा कर भवनामध्ये  शंभर टक्के तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे वस्तू व सेवा कर भवनामध्ये कामकाज जवळपास ठप्प आहे.  कारण कार्यालयामध्ये फक्त अधिकारी कामावर आलेले आहेत. मात्र इतर कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारून जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपात सहभागी झाले आहेत. जीएसटी भवनाच्या मेन गेटवर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे

Nashik News: संपाचा फटका रुग्णांना, नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल

Nashik News: जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आज संपावर गेले आहेत. मात्र याचा मोठा फटका रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना बसत असल्याचं नाशिकमध्ये समोर आलं आहे. एकीकडे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात परिचारिका ठिय्या आंदोलनाला बसल्या असतांनाच दुसरीकडे बाह्य रुग्ण विभागात दोन तीन तासांपासून केस पेपर काढण्यासाठी रुग्ण रांगेत उभे असून त्यांची भली कोठी रांग लागली आहे. कोणी 60 ते कोणी 90 किमीवरून उपचारासाठी येथे दाखल झाले असून कर्मचारी तसेच डॉक्टरही भेटत नसल्याने ते संतप्त झाल्याचं बघायला मिळतय. 

Hingoli Strike: जुन्या पेन्शनसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप, जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने

Hingoli Strike: जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारी सुद्धा आज संपावर गेले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयासमोर एकत्र येत निदर्शने केली आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी हे कर्मचारी आजपासून संपावर जात असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याची भूमिका यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या संपामध्ये अनेक आरोग्य विभागातील कर्मचारी परिचारिका यांच्यासह अन्य तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

Pandharpur News: पंढरपुरात जुन्या पेन्शनसाठी शेकडो कर्मचारी आक्रमक

Pandharpur News:   जो पेन्शन की बात करेंगा वही देशपे राज करेंगा .. पंढरपुरात जुन्या पेन्शनसाठी शेकडो कर्मचारी आक्रमक झाले. राज्य सरकार चुकीची आकडेवारी सादर करत असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. पंढरपूरमध्ये कर्मचारी रस्त्यावर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे. 

Ahmednagar News: जुनी पेन्शन मागणीसाठी राहुरी कृषी विद्यापीठात आंदोलन

Ahmednagar News:  जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज सुरू झालेल्या बेमुदत संपात राहुरी कृषी विद्यापीठातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांसह  कृषी विद्यापीठातील कर्मचारीही बेमुदत संपावर गेल्याने विद्यापिठातील कामकाज ठप्प झाले असून राज्य सरकार जुन्या पेंशन धोरणाबाबत काय निर्णय घेणार याकडं कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Maharashtra News: सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर, रुग्णसेवेवर ताण पडणार


Maharashtra News: महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन संघटना सुद्धा आज पुकारलेल्या संपात सक्रिय सहभागी असणार आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेवर या संपामुळे मोठा ताण पडणार आहे. यामध्ये तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी हे सकाळी साडेसात वाजल्यापासून संपावर गेले आहेत. सरकारी रुग्णालयातील नर्सेस, क्ष किरण विभाग तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ,लिपिक वर्ग, सफाई कामगार, कक्षसेवक हे सर्व कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा ढासळण्याची शक्यता आहे. सरकारी रुग्णालयात सर्व सेवा या डॉक्टर्स त्यासोबतच शिकाऊ परिचारिका आणि निवासी डॉक्टर यांच्यामार्फत सुरू राहतील मात्र या सेवा सुरू असताना इतर कर्मचाऱ्यांची साथ त्यांना आज मिळणार नाही

Parbhani Strike: परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारक, परिचरिकांचे काम बंद 

Parbhani Strike: परभणीतही या संपाला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारक परिचारिकांनी या संपात आपला सहभाग नोंदवत जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी समोर जोरदार निदर्शने केली आहेत. सरकारने इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

Yavatmal Strike: यवतमाळमध्ये बेमुदत विद्यार्थ्यांना संपाचा फटका

Yavatmal Strike: यवतमाळमध्ये जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने शासकीय व खाजगी, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. तर काही शाळेतील शाळा शिक्षकांविना सुरू आहे.

Nagpur Strike: कारवाई झाली तरी चालेल, मात्र आता मागे हटणार नाही

Nagpur Strike:  जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील अकराशे परिचारिका संपावर गेल्या आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवर दुपारनंतर परिणाम होण्याची शक्यता आहे.. रुग्णसेवा आमचा धर्म आहे, मात्र आमच्या भविष्यही आम्हाला सुरक्षित करायचा आहे. म्हणून आम्ही संप करत असल्याचा परिचारिकांचा म्हणणं आहे... त्यामुळे कारवाई झाली तरी चालेल, मात्र आता मागे हटणार नाही असा निर्धारही संप करणाऱ्या परिचारिकांनी व्यक्त केला आहे. एखादा आमदार पाच वर्षासाठी आमदार होतो आणि आयुष्यभर पेन्शन घेतो आम्हाला जर पेन्शन द्यायची नसेल तर आमदारांची ही पेन्शन रद्द करा अशी मागणी संपावर गेलेल्या परिचारिकांनी केली आहे. विशेष म्हणजे ज्या वयस्कर परिचारिकांना जुनी पेन्शन लागू आहे, त्याही या संपात सहभागी आहेत, उद्या आमची मुलं या क्षेत्रात येतील त्यांच्यासाठी आज आम्ही आंदोलनात उतरलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे.

Buldhana Strike: बुलढाणा - जिल्ह्यातील 28500 राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

Buldhana  Strike: बुलढाणा जिल्ह्यातील 28500 राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहे,  शिक्षण , आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

Dhule Strike:धुळे जिल्ह्यातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी चे 9 हजार 500 कर्मचारी आजपासून संपावर

Dhule Strike: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे 9 हजार 500 कर्मचारी आजपासून संपावर आहेत. 

पार्श्वभूमी

 मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या (Old Pension) मागणीवरुन राज्य सरकारचं टेन्शन वाढलं आहे. सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून संपावर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी संप करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यभरातील लाखो कर्मचारी संपावर आहेत. निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं मात्र, त्यावर समाधान न झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  


संपाचा सामान्यांवर परिणाम


दरम्यान, या संपामुळे सामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. राज्यातील शिक्षकांनीही संपाला पाठिंबा दिल्यामुळे दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे, अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचसोबत लोकांची सरकारी कार्यालयांतील दैनंदिन कामंही रखडण्याची शक्यता आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय? 


नवीन पेन्शन योजना रद्द करणे
प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन 
सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे
कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा
सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा
निवृत्तीचे वय 60 करा
नवीन शिक्षण धोरण रद्द करा
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करा


संपात सहभागी होणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई : सामान्य प्रशासन विभाग


महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.  राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव भांगे यांनी म्हटले आहे.


राज्य सरकार काय तोडगा काढणार?


कोल्हापूर, नागपूर, सांगली, ठाण्यासह अनेक ठिकाणी कर्मचारी संघटनांनी मोर्चे काढले. त्यानंतर याच संदर्भात एक महत्वाची बैठक झाली. पण, तोडगा निघाला नाही मग, सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. पण, तिथेही तोडगा निघालाच नाही आणि त्यानंतर संघटनांच्या समन्वयकांनी संपाची घोषणा केली. सगळ्या ठिकाणचे कर्मचारी संपावर गेले तर याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावरही होईल. त्यामुळे आता राज्य सरकार काय तोगडा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.