मुंबई : ऑक्टोबर-डिसेंबर 2024 कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे (एमएमआर) मध्ये गृहविक्रीत 31 टक्क्यांची घट झाल्याचे तसेच नवीन प्रकल्पही कमी झाले असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम या डिजिटल रिअल इस्टेट व्यवहार आणि सल्ला देणाऱ्या मंचाच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. विक्रीच्या संख्येत घट होण्यामागचे कारण प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुका तसेच मालमत्तेच्या वाढत्या किंमती असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल: अॅन्युअल राऊंडअप 2024’ अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा भारताच्या रेसिडेन्शियल मार्केटमध्ये लक्षणीय वाटा असल्याने समग्र देशाच्या आकडेवारीत देखील ही घट प्रतिबिंबित झालेली दिसते. हा डेटा दर्शवितो की गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एनसीआर वगळता देशभरात घरांच्या विक्रीत घट झाली आहे.
निवडणुकांचा प्रभाव 2024च्या तिमाहीतमध्ये लॉन्च होणाऱ्या नवीन घरांच्या संख्येवर देखील स्पष्ट दिसून आला. या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत 39% घट झाली आहे. याचे कारण आहे राज्यातील निवडणुकांमुळे प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया मंदावली होती. अहवालात समाविष्ट असलेल्या 8 पैकी 5 शहरांमध्ये 2024च्या अंतिम तिमाहीत नवीन घरे लॉन्च होण्याची संख्या कमी झाली आहे. हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे सीईओ श्री. ध्रुव अग्रवाल म्हणाले, “ऑक्टोबर-डिसेंबर या सणासुदीच्या मोसमात मागील तिमाहीच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे, परंतु विक्री आणि नवीन लॉन्चिंग या दोन्ही बाबतीत मागील वर्षाच्या या कालखंडाशी तुलना केल्यास बहुतांशी भागांमध्ये घट झाल्याचेच दिसून येते. जागतिक आर्थिक अनिश्चितता, मुख्य राज्यांमधील निवडणुका आणि देशभरात मालमत्तेच्या किंमतीत झालेली वाढ या घटकांमुळे विकासक आणि खरेदीदार या दोघांनी थांबून प्रतीक्षा करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते.”
अग्रवाल पुढे म्हणाले, “दिल्ली एनसीआर हे घरांच्या विक्रीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत वृद्धी दाखवणारे एकमेव मार्केट ठरले. एमएमआर, पुणे आणि बंगळूर या मोठ्या बाजारपेठांसहित इतर प्रांतांमध्ये घरांच्या विक्रीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. व्याज दारांत घट होण्याची शक्यता इतक्यात दिसत नसल्याने आणि आर्थिक वृद्धी मंदावल्यामुळे आगामी तिमाहींमध्ये मार्केट सावध राहील अशीच अपेक्षा आहे.”
नवीन घरांची विक्री
सर्वात मोठ्या आठ शहरांपैकी फक्त दिल्ली एनसीआरमध्ये नवीन घरांच्या विक्रीत सकारात्मक वृद्धी नोंदवण्यात आली आहे. या प्रांतात ऑक्टोबर-डिसेंबर२४ या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ९८०८ इतकी नवीन घरे विकली गेली. ही संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ६५२८ होती. ३३,६१७ घरांच्या विक्रीसह एमएमआरने मार्केट लीडर म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. परंतु गेल्या वर्षी हा आकडा ४८,५५३ होता, म्हणजेच यात ३१% वार्षिक घट झाली आहे. त्या पाठोपाठ पुण्यात १८,२४० घरे विकली गेली, ही देखील ३१% वार्षिक घट आहे. दक्षिणेत बंगळूर येथे १३,२३६ घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे (वार्षिक २३% घट), हैदराबादेत १३,१७९ घरांच्या विक्रीची नोंद आहे (वार्षिक ३६% घट), तर चेन्नई येथे ४०७३ घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे (वार्षिक ५% घट).
नवीन घरांचे लॉन्चिंग
२०२४ वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशातील सर्वात मोठ्या आठ हाऊसिंग मार्केट्समध्ये नवीन घरांच्या लॉन्चिंगमध्ये वार्षिक ३३% घट झाली आहे. हैदराबादमध्ये सर्वात जास्त घट झाली असून केवळ ९०६६ घरे लॉन्च झाली (६६% घट), त्या पाठोपाठ अहमदाबादेत ३५१५ घरे (६१% घट) आणि कोलकाता येथे ३०९१ घरे (४१% घट) लॉन्च झाली आहेत. सकारात्मक बाजू ही आहे की, दिल्ली एनसीआरमध्ये १००४८ घरांच्या लॉन्चिंगसह वार्षिक १३३% वाढ झाली आहे. चेन्नई येथे ४००५ घरांसह ३४% वाढ आणि बंगळूर येथे १५१५७ घरांसह वार्षिक २०% वाढ झाली आहे.
हेही वाचा
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले