मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पॉलिटिकल ड्रामा सुरु होता, आता त्यावर पडदा पडला आहे, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार पुन्हा आपल्या कुटुंबात आणि राष्ट्रवादीत परतले. घडलेल्या सर्व प्रकारावर बोलताना नवनिर्वाचित आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रीया दिली. 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपने स्थापन केलेलं सरकार अवघ्या 72 तासांतच कोसळलं.


पाहा व्हिडीओ : पुढच्या पाच वर्षात खूप काम करायचं आहे : रोहित पवार



अजित पवारांविषयी बोलताना रोहित पवारांनी सांगितले की, 'दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचं टीव्हीवर पाहिलं, पण विश्वास बसत नव्हता. का झालं?, कसं झालं?, याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला नाही. आता पुढे काय होणार हे माहीत नव्हतं, पण दादा परत नक्की येणार असा विश्वास होता.' रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, 'आम्ही दादांना ओळखतो. इतक्या कसोटीच्या क्षणीही दादांनी कुटुंबियांसोबतच इतरांचेहे फोन घेतले. काहीही झालं तरी कुटुंबाकडे दुर्लक्षं करून चालत नाही. आमचं एक कुटुंब आहे आणि एकच राहिल.'

राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार

मी सातत्याने सांगत असतो की, आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, दादांची काम करण्याची पद्धत आणि क्षमता आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे दादांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी परत यावं, अशी अपेक्षा होती. दादा परतल्यानंतर पुन्हा एकदा साहेबांना भेटले, ही आमच्यासाठी गोड बातमी आहे, कुटुंबीय म्हणून आनंद झालाच पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणूनही तेवढाच आनंद झाला. दादांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर साहेब अस्वस्थ होते. पण ते अस्वस्थ असल्याचं कधीच दाखवत नाहीत, ते आलेल्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा याचाच विचार करत असतात.' असं रोहित पवार यांनी सांगितलं.

भाजपमुळे पवार कुटुंबात फूट पडेल अशी भिती कुठेतरी मनात होती का?, असं विचारल्यावर रोहित पवार म्हणाले की, भाजपला विकासाची निती कधीच दिसत नाही. त्यांची स्टाईल ही नेहमीच तोडाफोडीची असते. तिच स्टाईल त्यांनी यावेळीही लागू करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी दादांनाही ही स्टाईल योग्य वाटत नसेल म्हणूनच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि साहेबांची भेट घेतली.'

संबंधित बातम्या :

आमदारांचा शपथविधी, विधानभवनातील खास क्षण

'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... 28 तारखेला उद्धव ठाकरे शपथ घेणार