मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिलं आहे. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना आज पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे. आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली.


उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द
59 वर्षांच्या उद्धव ठाकरेंसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. नव्वदच्या दशकात उद्धव ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. 1985 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला. या निवडणुकीपासून त्यांनी शिवसेनेच्या निवडणूक कॅम्पेनिंगमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. दैनिक सामनाचा पाया महाराष्ट्राभर भक्कम करण्यातही उद्धव ठाकरेंचा वाटा मोलाचा वाटा होता. पण असं असलं तरी त्यांनी त्या काळात राजकीय जीवनात प्रवेश केला नव्हता. किंबहुना बाळासाहेबांचा लाडका 'डिंगा' आणि ठाकरे परिवाराचा 'दादू' भविष्यात राजकारणाच्या वाटेनं जाईल, असा विचार त्या काळात कुणाच्याही मनात डोकावला नव्हता.

राज-उद्धव वॉर
तो काळ शिवसेनेच्या एका वेगळ्या युवा नेतृत्वानं भारावून टाकणारा होता. त्या काळात आणखी एका ठाकरेंचाच महाराष्ट्राच्या राजकीय क्षीतिजावर उदय झाला होता. ते होत राज ठाकरे. 1997 आणि 2002 सालच्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला यश मिळालं. पण भाऊ राज ठाकरे नाराज होते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांची तिकिटं कापल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.2003 साली महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन पार पडलं..ते गाजलं फक्त राज ठाकरेंच्या एका प्रस्तावामुळे. आणि तो होता उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाचा.

उद्धव ठाकरेंची कार्य़ाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरला. त्यातूनच राज ठाकरेंच्या मनातली धुसफूस वाढली. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांना विरोध करण्याच्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्या मी मुंबईकर या सर्वसमावेशक चळवळीचा बळी गेला. पुढे राज ठाकरेंचं बंड होण्याआधी शिवसेनेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं. त्यामुळे राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. राणेंपाठापोठ 2006 साली राज ठाकरेंनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करून वेगळी वाट धरली.

राज ठाकरे आणि राणेंचं बंड अन् हृदयविकार
उद्धव ठाकरे स्वभावानं शांत आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व हे संयमी आहे. त्याउलट त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे हे आक्रमक स्वभावाचे आणि बाण्यानं पक्के शिवसैनिक आहेत. त्यात बाळासाहेबांच्या घणाघाती वक्तृत्वशैलीची छापही राज ठाकरेंमध्येच आढळते. त्याच राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडल्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासमोरची आव्हानं आणखी वाढली. महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी आणि आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप कष्ट घ्यावे लागले. 2012 हे वर्ष उद्धव ठाकरेंच्या आयुष्य़ातलं सर्वात जास्त संघर्षाचं ठरलं. राजकीय जीवनातल्या वाढत्या ताणतणावापायी उद्धव ठाकरेंना हृदयविकाराला सामोरं जावं लागलं. जुलै 2012 मध्ये मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर बायपास करण्याची वेळ आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन
त्या धक्क्यातून सावरायच्या आत उद्धव ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांवर जणू आभाळच कोसळलं. 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आधार गेला. ते एकटे पडले. त्यांना राजकीय संघर्षाबरोबरच घरगुती संघर्षालाही सामोरं जावं लागलं. पण इथंच उद्धव ठाकरेंचा शांत आणि संयमी स्वभाव त्यांच्या कामी आला. त्याच गुणांनी त्यांना दोन्ही आघाड्यांवरच्या संघर्षातून तारून नेलं.

रश्मी ठाकरेंची साथ
बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या संघर्षाच्या काळात जशी त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची मोलाची साथ लाभली. तशीच भूमिका रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या जीवनात बजावली. रश्मीवहिनी राजकारणात उतरल्या नाहीत, पण त्यांनी पदर खोचून ठाकरे आणि शिवसेनेचा प्रचंड परिवार सांभाळला. त्यामुळं उद्धवजींना शिवसेनेचं नेतृत्व सांभाळणं सोपं झालं. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरु केलेला संघर्ष उद्धव ठाकरेंनी पुढे सुरु ठेवला.


दोन वर्षांत देशात लोकसभा निवडणुका झाल्या. शिवसेनेनं पारंपरिक मित्र भाजपच्या साथीनं लोकसभेत चांगलं यश मिळालं. पण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं सेनेची साथ सोडली. केंद्रात बहुमतात असलेल्या भाजपला शिवसेनेनं आव्हान दिलं. दोन्ही काँग्रेसचा पराभव जवळपास निश्चित असताना शिवसेना भाजपसमोर टिकेल का असा सवाल विचारला जाऊ लागला. पण मोदी, शाह आणि फडणवीसांच्या झंझावातासमोर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पाय रोवून उभे राहिले. त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं एकट्यानं लढून विधानसभेत तब्बल 63 जागांवर विजय मिळवला..

उद्धव ठाकरे यांनी त्यानंतरही आपला मुरब्बीपणा दाखवला. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी काही महिन्यांतच शिवसेनेला भाजपसोबत सत्तेवर बसवलं. पण सत्तेत बसूनही त्यांनी विरोधकांची स्पेस काबीज करून सरकारला धारेवर धरलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधला वाद इतका टोकाला गेला की उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलं. पण उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेचा गड आपल्याकडेच कायम राखला. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीआधीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली परिपक्वता आणखी दिसून आली. त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना मातोश्रीची वारी करायला लावली. त्यानंतरच त्यांनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं.

शिवसेना-भाजपची युती विधानसभा निव़डणुकीतही कायम राहावी म्हणून उद्धव ठाकरेंनी जागांची तडजोड मान्य केली. त्या वेळी एक पाऊल मागं घेताना त्यांनी दुसरं पाऊल नेटानं पुढे टाकलं. 'मातोश्री'तल्या ठाकरेंनी निवडणूक न लढवण्याच्या परंपरेला त्यांनी पहिल्यांदा छेद दिला. उद्धव ठाकरेंचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि वरळी मतदारसंघातून त्यांनी मोठा विजयही मिळवला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानं महाराष्ट्राचं राजकीय चित्र पुन्हा बदललं. आणि निमित्त ठरलं जागाचं गणित आणि नवी राजकीय समीकरणं लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका.

लोकसभेच्या निवडणुकीआधी ठरलेल्या 50-50च्या फॉर्म्युल्यानुसार आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्या, ही भूमिका उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी लावून धरली. नाहीतर आम्हाला आमचे पर्याय आहेत, असं सांगून त्यांनी भाजपला थेट अंगावर घेण्याची हिंमत दाखवली. या राजकीय लढाईची सारी सूत्रं आपला वजीर संजय राऊत यांच्या हाती सोपवून उद्धव ठाकरेंनी भाजपला आणखी डिवचण्याची संधी सोडली नाही. अखेर शिवसेना-भाजप युती कायमची तुटली. पण आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी शिवसेनेनं चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आपली सोयरिक जुळवली.

अजित पवारांच्या बंडानं उद्धव ठाकरे यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असं वाटत असतानाच शरद पवार महाविकासआघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळं साहजिकच अजितदादांचं बंड फसलं आणि त्यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही. अखेर शिवसैनिकांच्या मनातला विश्वास खरा ठरला. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाची माळ उद्धव ठाकरे यांच्याच गळ्यात पडली. त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचनही उद्धव ठाकरे यांच्याकडून पूर्ण झालं. महाराष्ट्राला बीस साल बाद पुन्हा एक शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून मिळाला. आणि तमाम शिवसैनिकांच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे तो मुख्यमंत्री त्यांच्या मनातला आणि थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नातं सांगणारा आहे.