मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. हा ड्रामा सुरु असताना आज राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. कोणालाही कल्पना नसताना भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कालपासून माध्यमांचे आणि राज्यातील जनतेचे संपूर्ण लक्ष हे महाविकासआघाडीकडे होते. परंतु सकाळी भाजप आमदाराने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

असा आहे कालपासूनचा घटनाक्रम

शुक्रवारी रात्री 9.30 वा – माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यास गेले. फडणवीसांनी आपल्याकडे 173 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. यामध्ये राष्ट्रवादीचे 54, 14 अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे आमदार आपल्यासोबत असल्याचे सांगितले.

रात्री 12 वा – राष्ट्रवादीचे विधानसभेचे गटनेते अजित पवार 54 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निवासस्थानी पोहोचले. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना समर्थन असल्याचे पत्र राज्यपालांना दिले. या पत्रानंतर कोश्यारी यांची फडणवीसांकडे बहुमत असल्याची खात्री झाली.

रात्री 12.30 वा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात सत्तास्थापनेसाठी परिस्थिती अनुकूल असल्याने राज्यातील राष्ट्रपती शासन हटवलं जाऊ शकतं, असं शिफारस करणारं पत्र केंद्राकडे पाठवलं.

शनिवारी (23 नोव्हेंबर) पहाटे 5.30 वा – राज्यातील राष्ट्रपती शासन हटवण्याचे निर्देश केंद्राकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले.

पहाटे 5.45 वा –राज्यातील राष्ट्रपती शासन हटवल्याचं नोटिफिकेशन राज्यपालांकडून जारी करण्यात आलं.

सकाळी 6 वा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी करण्याचा निर्णय घेतला.

सकाळी 6.30 वा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी हा सकाळीच करण्याचे निवेदन देण्यात आले.

सकाळी 8 वा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनावर एका छोटेखानी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.

सकाळी 8.30 वा –राजभवनावरून शपथविधी आटोपून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, गिरिश महाजन निघाले. सर्वजण वर्षावर दाखल.

सकाळी 8.50 वा – शरद पवारांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्दळ सुरु. प्रफुल पटेल, छगन भुजबळ पोहोचले.

सकाळी 9 वा – मातोश्री, सिल्व्हर ओक, अजित पवारांचं खासगी निवासस्थान या सर्व ठिकाणी सुरक्षाव्यवस्था अभूतपूर्व पद्धतीने वाढवण्यात आली.

सकाळी 9.35 वा – शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली. अजित पवारांनी पाठीत वार केला, असे वक्तव्य राऊतांनी केले. शपथविधीबाबत एवढी गुप्तता का पाळली केली? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळी 9.45 वा – भाजप नेते चंद्रकांत पाटील, गिरिश महाजन यांनी महाजनांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जल्लोष साजरा केला. त्यानंतर त्यांची प्रदीर्घ पत्रकार परिषद झाली.

सकाळी 10.10 वा – भाजपकडून सर्व आमदारांना तातडीने मुंबईला निघण्याच्या सूचना.

सका 10.30 वा – नवाब मलिक शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल.

सका 10.35 वा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भुपेंद्र यादव, विनोद तावडे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांची वर्षा बंगल्यावर बैठक सुरु. सर्व अपक्षांना संपर्क करून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरु. त्यासाठी वर्षावर खलबतं सुरु.

सकाळी 11 वा – होटेल मरिन प्लाझामधे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठक सुरु. मल्लिकार्जुन खर्गे, माणिकराव ठाकरे, के.सी.वेणुगोपाल, अहमद पटेल यांच्या उपस्थितीत बैठक.

सकाळी 11.05 वा – सिल्व्हर ओकवरून राष्ट्रवादी नेते बाहेर पडायला सुरूवात. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील निघाले.

सकाळी 11.15 वा – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर अत्यंत भावूक प्रतिक्रिया.

सकाळी 11.20 वा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सिल्व्हर ओकवरून यशवंतराव चव्हाण सेंटरकडे निघाले.

सकाळी 11.25 वा – उद्धव ठाकरे मातोश्रीवरून यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना. सोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित.

सकाळी 11.40 वा –काँग्रेस नेते , पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ गायकवाड, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले.

सकाळी 11.45 वा –राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सुशील कुमार शिंदे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले.

दुपारी 12.05 वा – उद्धव ठाकरे नरीमन पॉइंटला पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळेदेखील पोहोचल्या. यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली.

दुपारी 12.20 वा –मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर लगबग, संपूर्ण परिसरात झेंडे लावण्यास सुरूवात.

दुपारी 12.25 वा – विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांच्या बैठकीसाठी काँग्रेसचे सर्व नेते यशवंतराव चव्हाण सेंटरमधून वडेट्टीवारांच्या बंगल्याकडे रवाना.
दुपारी 12.30 वा –अजित पवार हे त्यांचे बंधू श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी सहपरिवार उपस्थित.

दुपारी 1.20 वा – काँग्रेस नेत्यांची बैठक संपली.

दुपारी 1.30 वा – उद्धव ठाकरे यशवंतराव चव्हाण सेंटरमधून निघून शिवालयमध्ये (शिवसेना कार्यालय) पोहोचले.

दुपारी 1.45 वा –काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, माणिकराव ठाकरे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल यांची पत्रकार परिषद. भाजपवर गलिच्छ राजकारणाचा आरोप.

दुपारी 1.50 वा – अजित पवारांची एबीपी माझाशी खास बातचित केली. मला आता काहीही बोलायचं नाही. मी माझ्या सोयीने माझी भूमिका स्पष्ट करेन, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

दुपारी 2.30 वा – काँग्रेसचे आमदार सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्णाय पक्षाने घेतला.

दुपारी 2.45 वा – अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ. श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच फौजफाटा तैनात.

दुपारी 3.15 वा – राष्ट्रवादीचे दहा आमदार धनंजय मुंडेंसह मुंबईबाहेर रवाना झाले.

बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया कशी पार पडेल? माजी विधीमंडळ सचिव अनंत कळसेंचं विश्लेषण



'त्या' निर्णयात शरद पवारही सामील; नवनीत कौर राणांचा आरोप