मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि इतिहासात काका-पुतण्याचं नातं नवं नाही. अगदी पेशव्यांच्या काळातही या नात्याला विशेष असल्याचं पाहायलं मिळतं. राज्याच्या राजकारणातील काही काका-पुतण्यांमध्ये एकवाक्यता आहे, तर अनेक काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले दिसतात. मात्र काका-पुतण्या वादाचा अध्याय पवार कुटुंबातही दिसला. अजित पवार यांनी आज बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा धक्का केवळ पवारांनाच नाही तर अख्खा महाराष्ट्राला आहे. याआधी अनेक पुतण्यांनी काकांना सोडल्याची उदाहरणं आहेत. आता यामध्ये अजित पवार यांचीही समावेश झाला आहे.

राज ठाकरे-बाळासाहेब ठाकरे


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2005 मध्ये मोठा निर्णय घेतला. 27 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांनी शिवसेना सोडली. राज यांच्या जाण्याने पहिल्यांदाच एक 'ठाकरे' शिवसेनेतून बाहेर पडले. यानंतर 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. काकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार समजले जात होते. परंतु महाबळेश्वर इथे 30 जानेवारी 2003 रोजी झालेल्या अधिवेशाने राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी दिली. या अधिवेशनात उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेचे वारसदार असणार यावर शिक्कामोर्तब झालं. हा राज ठाकरेंसाठी मोठ धक्का होता. यातूनच राज यांनी शिवसेनेला, पर्यायाने बाळासाहेबांना जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली.

धनंजय मुंडे-गोपीनाथ मुंडे


गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते. 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. परंतु धनंजय मुंडे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती. जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. आणखी यानंतर 2013 मध्ये गोपीनाथ मुंडेंना रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली.  अत्यंत चुरशीची लढतीत त्यांचा विजय झाला.

अजित पवार-शरद पवार


अजित पवार यांच्या मनात अनेक वर्षांपासून साचून राहिलेली खदखद अखेर आज (23 नोव्हेंबर) बाहेर पडली. पक्ष नेतृत्त्वाकडून म्हणजेच शरद पवार यांच्याकडून आपल्या राजकीय कर्तृत्त्वाला न्याय मिळत नसल्याची भावना अजित पवार यांच्या मनात मागील 15 वर्षांपासून साचली होती. ती आज भाजपला साथ देऊन बाहेर पडली. अजित पवारांनी बंड केलं आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून एकदा मुख्यमंत्रीपदाची आणि एकदा उपमुख्यमंत्रीपदाची (दोन्ही सन 2004 मध्ये) संधी डावलली गेली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वत:च्याच मुलाला पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिघांच्या सरकार स्थापनेची चर्चा सुरु झाली. मात्र 'राष्ट्रवादी'ला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्यासंदर्भातला मुद्दा शरद पवार यांनी फेटला. या पार्श्वभूमीवर व्यथित झालेल्या अजित पवारांनी अखेरी बंडाचा झेंडा फडकावला.

संदीप क्षीरसागर-जयदत्त क्षीरसागर


धनंजय मुंडे यांच्यावरच्या नाराजीतून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने याच मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बीड मतदारसंघातली लढत काका-पुतण्यातली लढत झाली. क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या या राजकारणात आहेत. केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं राजकारणात आहेत. आईसह तिघाही भावांची कारकीर्द आधी काँग्रेसमध्ये गेली आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले. मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये विसंवाद सुरु झाला आणि त्याला कारण ठरलं सत्तेतील वाटा. आता जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत, तर रवींद्र क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत. सत्तेचं असमान वाटप झाल्याच्या भावनेतून क्षीरसागर कुटुंबात ही फूट पडली.