रत्नागिरी : निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर सत्ताधारी, विरोधक सारेच दौरे करतात. आश्वासनं मिळतात. हजारो कोटी रूपयांची पॅकेजस जाहीर होतात. पण, या साऱ्याचं फलित काय? नेत्यांची पाठ फिरली की, आश्वासनं देखील हवेतच विरतात? मुळात शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या मदतीचा आकडा पाहता त्यातून त्याला किती मदत होते? हा देखील प्रश्नच आहे. सरकार कुठलंही असो पण, मिळतात ती केवळ आश्वासनं. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये भरडला जातो तो शेतकरीच. गेल्यावर्षी देखील परतीच्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं. राज्यातील सर्वच भागांमधील शेतकऱ्यांची सारखीच स्थिती होती. यंदा देखील शेतकरी या परतीच्या पावसाच्या तडाख्यातून सुटला नाही. यंदा देखील शेतकऱ्याला मदत जाहीर झाली. पण, गेल्यावर्षीच्या मदतीचं काय? ती किती शेतकऱ्यांना मिळाली? शिवाय, जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांना, त्यांच्या खात्यात जमा झाली की नाही याबद्दल मात्र कुणालाच काही देणंघेणं नसल्याचं दिसून येतं.



आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा, आश्नासनं पण मदतीचं काय?


गेल्यावर्षी कोकणातील भातशेतीचं देखील मोठं नुकसान झालं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी यांनी कोकण दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आदित्य यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुवे गावाला देखील भेट दिली. या गावातील विनायक निमण या शेतकऱ्याशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यानं त्यांना सारी परिस्थिती सांगितली. 'आता आम्ही आत्महत्या करायची का?' असा सवाल देखील केला. त्यावेळी 'तुम्ही काहीही काळजी करण्याची गरज नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही. सरकार तुमच्याकडे येईल' असं आश्वासन देत शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यानंतर मदतीकरता पॅकेज देखील जाहीर झालं. पण, वर्षभरानंतर देखील या शेतकऱ्याच्या खात्यात एकही रूपया जमा झालेला नाही. केवळ विनायक निमण नाही तर इतर शेतकऱ्यांच्या देखील सारख्याच व्यथा आहेत. 'वर्षभरानंतर देखील जाहीर झालेली मदत खात्यात जमा झालेली नाही. यंदा देखील पावसानं सारं नेलं. त्यामुळे आम्ही करायचं काय? यंदा देखील पंचनामे सुरु आहेत. मदत मिळेल असं अधिकारी सांगत आहेत. पण, गेल्यावर्षीची मदत मिळाली नाही. ती अगोदर द्या' अशी मागणी शेतकरी करत आहेत. शिवाय, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या व्यथा या सारख्याच आहेत.


दौऱ्यांचं फलित काय?


मदत करताना सरकारला काही मर्यादा आहेत. याबद्दल काहीही शंका नाही. पण, दिली जाणारी मदत देखील वर्षभरानंतर मिळत नसेल तर नेमका फायदा काय? नेत्यांच्या पाहणी दौऱ्याचं फलित काय? असा सवाल आता विचारला जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा. पण, याच पोशिंद्याला दिली जाणाऱ्या मदतीची अशी अवस्था असेल तर त्यानं काय करायचं? दौरे झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम केव्हा जमा होणार हाच प्रश्न आहे.


निकष बदलण्याची मागणी


कोकणात दिल्या जाणाऱ्या मदतीचे निकष बदला अशी मागणी केली जात आहे. कारण, कोकणात शेतकऱ्यांच्या जमिनी या गुंठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांना मदत देताना गुंठ्यावर द्या अशी मागणी देखील शेतकरी करत आहेत. सद्यस्थितीत कोकणातील गुंठ्याला 68 रूपये मदत मिळते. त्यातून काय होणार? असा देखील सवाल विचारला जात आहे. कोकणातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी यामध्ये पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा