Bhandara Latest News update : अचानक प्रकृती बिघडल्यानं भास्कर तुपट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरात वडिलांचा मृतदेह असताना मुलगा ओमकार याचा दहावीचा भूमिती विषयाचा पेपर ( SSC Exam 2023 ) होता. वडिलांच्या मृत्यूचं दुःख मनात असतानाही मन मोठं करून मुलगा ओमकार याला कुटुंबीयांनी धीर दिल्यानं दहावीचा पेपर दिला. हा प्रकार भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव इथं घडला. दरम्यान असाच प्रकार 6 मार्चला सोनी इथं घडला होता.
भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील ओमकार तुपट हा लाखांदूर येथील शिवाजी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता त्याचा भूमिती विषयाचा पेपर होता. दरम्यान, पाच दिवसांपासून ओमाकरचे वडील भास्कर यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळं त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरच्या माध्यमातून औषोधोपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्यानं त्यांचं बुधवारी सकाळी अचानक निधन झालं. दरम्यान, ओमकारने वडील गेल्याने हंबरडा फोडला. याचवेळी कुटुंबियांनी ओमकारचा दहावीचा पेपर असल्याने वर्ष वाया जावू नये, म्हणून त्याला धीर देत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करत परीक्षा केंद्रावर पाठविले.
दरम्यान, ओमकार याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मृतदेह घरी असल्याची माहिती परीक्षा केंद्रावरून ( SSC Exam 2023 ) शिक्षकांना मिळाली. त्यांनीही ओमकारला धीर देत परीक्षेला बसवले. अगदी मनावर ताबा ठेवत त्याने भूमितीचा पेपर दिला. या प्रसंगामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले.
आधी पेपर नंतर अंत्यसंस्कार -
कुटुंबीयांनी दिलेल्या भक्कम धीरानंतर ओमकरनं मी परीक्षा देवून येतो, तोपर्यंत वडिलांवर अंत्यसंस्कार करू नका, असं म्हणत घरून परीक्षा केंद्रावर पोहचला. तोपर्यंत कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी करून ठेवली. तीन तासानंतर ओमकार जेव्हा पेपर देवून घरी परतला, तेव्हा त्यानं वडिलांचा मृतदेहाला जवळ घेत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचे रडणे बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
याआधीही घडली होती अशीच घटना
यापूर्वी 6 मार्च रोजी येथील लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात असाच प्रकार घडला होता. वडिलांचा मृतदेह घरी असताना प्राची राधेश्याम सोंदरकर हिने दहावीचा पेपर दिला होता. घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार, संवर्ग विकास अधिकारी जी. पी. अगर्ते हे भरारी पथकासह परीक्षा केंद्रावर जावून त्यांनी ओमकरला धीर दिला होता.
आणखी वाचा :
कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान, पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा