Mumbai Crime News : मुंबई रेल्वेच्या दरवाज्यात (Mumbai Local Train) उभे राहून प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या महिला किंवा इतर प्रवाशांना टपली मारून किंवा अश्लील भाषेत टोमणे मारून छेडणाऱ्या आणि रील (Reel) बनवणाऱ्या तरुणांचा सध्या सुळसुळाट झाला असल्याचे चित्र आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील तरुणांनी थेट महिला पोलिसांची छेड काढली असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकातील (Bandra Station) हा प्रकार असल्याचे दिसत आहे. एका रील करणाऱ्या तरुणांकडून लोकलच्या दरवाजात उभे राहून कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेचा वापर करून छेडण्याचा प्रयत्न करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. यासंबंधीची एक तक्रार वांद्रे लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली असून आता त्या रील बनवणाऱ्या व महिलांना छेडणाऱ्या आरोपीचा वांद्रे लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एका उनाड तरुणाने रील बनवला. या रील मध्ये स्वतःला मस्तान कंपनीचा म्होरक्या असल्याचे सांगितले. या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत बोलून असभ्य वर्तन करत असल्याचे दिसून आले आहे. यासंबंधीचा व्हिडीओ एका जागरूक नागरिकाने मुंबई पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांना ट्विटरवर टॅग केला आहे. यानंतर आता वांद्रे लोहमार्ग पोलीस या मस्तान कंपनीच्या म्होरक्याला शोध घेत आहेत.
लालबागमध्ये आईची हत्या करून शरीराचे केले पाच तुकडे, क्रूर मुलीचे कृत्य
मंगळवारी रात्री मुंबईतील काळाचौकी पोलीस स्टेशन अंतर्गत लालबाग येथून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे इब्राहिम कासम इमारतीत राहणाऱ्या 23 वर्षीय रिंपल जैन या मुलीने तिच्या 55 वर्षीय आई वीणा प्रकाश जैन यांची हत्या केली. काळाचौकी पोलिसांनी या प्रकरणी काल रिंपल या मुलीला अटक केली असून तिला काळाचौकी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पोलिसांनी घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता व चाकू जप्त केला असून आरोपी मुलीने या धारदार शस्त्राच्या सहाय्याने महिलेच्या शरीराचे पाच तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तिच्याच घरातील कपाटात व लोखंडी पाणीच टाकीत ठेवले होते.