मुंबई: दूध दरात वाढ व्हावी, यासाठी आज राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पाण्याच्या बाटलीला 20 रुपये दर असताना, दुधाला मात्र 15 ते 18 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दुधाला सरकारने ठरवलेल्या दर मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

औरंगाबादेत मोफत दूध

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात लाखगंगा गावामध्ये मोफत दूध वाटून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

सरकारच्या दगडी प्रतिमेला दुग्धाभिषेक

तिकडे शिर्डीत शेतकऱ्यांनी सरकारच्या दगडी प्रतिमेला दुधाचा अभिषेक घातला. परभणी जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या घोषणा दिल्या.  यावेळी रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना थांबवून दूध वाटप केलं.

सध्या दूध उत्पादकांना 15 ते 20 रुपये प्रतिलीटर इतका भाव मिळत आहे. सरकारनं 27 रुपये प्रतिलीटरनं दूध घेऊ असं आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे सरकारनं दूधदरवाढीचं दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं, अशी मागणी दूधउत्पादक शेतकऱ्यांची आहे.

कोल्हापूर, सांगलीत आंदोलन

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे गाईच्या दुधाला 27 रुपये प्रतिलिटर एवढा दर देणे बंधनकारक आहे. मात्र राज्यातील एकही दूध संघ एवढा दर देत नाही. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही दूध संघ 22 रुपयापासून 25 रुपयांपर्यंत दर देतात तर उर्वरित महाराष्ट्रात हे दूध दर 20 रुपयांच्या आसपास आहेत.

दुधाला कमी मागणी, त्याचबरोबर दूध पावडरचे दर घसरल्याने दूध दर देऊ शकत नसल्याचं दूध संघ सांगत आहेत. तर वाढलेला उत्पादन खर्चामुळे गायीचे दूध उत्पादन करण्यास परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यासाठी कर्नाटक आणि गोवा सरकार ज्याप्रमाणे दुधाला अनुदान देतं अशा प्रकारे अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या

  • सरकारने ठरवल्याप्रमाणे दुधाला दर द्या

  • पशूखाद्याला अनुदान द्या.

  • दूध उत्पादकाचे संरक्षण व्हावे.

  • वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे दर देत आहेत. त्यावर नियंत्रण आणावे.

  • शासनाने म्हैस आणि गायीच्या दुधासंदर्भात धोरण ठरवावं


 मुख्यमंत्र्यांचा  इशारा

शेतकऱ्यांना सरकारने ठरवलेला दुधाचा दर न देणारे दूध महासंघ बरखास्त करु, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सरकारने 27 रुपये प्रति लीटर दर ठरवला आहे. अडेल भूमिका घेणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करेल.

सरकार दुधाच्या एक ब्रँडसाठी आग्रही आहे. महाराष्ट्रात एक ब्रॅण्ड करण्यासाठी 10 बैठका झाल्या. मात्र अजून ही निर्णय होऊ शकला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महादेव जानकर, दुग्ध विकास मंत्री

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याने त्याचा परिणाम इथे होतेय. तरीदेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्याच्या नोटीस आम्ही दूध संघांना पाठवल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला नाही,  तर 6-7 दिवसात त्यांच्यावर सरकार कठोर कारवाई करेल. दूध उत्पादकांना योग्य हमीभाव देण्यासंदर्भात सरकार लवकरच कायदा आणत आहे, असं दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं.