सांगली: भाजपच्या हातात देशाची सूत्रे जाणे म्हणजे हे देशाचे दुर्दैव आहे. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं अशी सध्याची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने मिरजेतील किसान चौकात एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

“शेतकऱ्यांची 34 हजार कोटींची कर्जमाफी करत 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा मुख्यंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. मात्र फडणवीस यांनी ते सिद्ध करून दाखवावे, आम्ही निवडणुका सोडून देऊ” असे आव्हान अशोक चव्हाण यांनी दिले.

भाजप म्हणजे भारत जलोओ पार्टी असून भाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? याचे देवेंद्रजींनी उत्तर द्यावे, असं म्हणत पेट्रोल दरवाढीवरुनही चव्हाण यांनी भाजपवर टीका केली.

सांगलीत काँग्रेसचीच सत्ता राहायला हवी. काँग्रेसचे सरकार येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असं अशोक चव्हाण म्हणाले.