Krishna-Bhima Sthirikaran Project:  पावसाळ्यात सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील महापुरात वाहून जाणारे पाणी पुणे, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला देणाऱ्या कृष्णा खोरे 'फ्लड डायवर्जन प्रोजेक्ट'ला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता  मान्यता दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिली. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातील आमदार जीवन गोरे, राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आदी आमदार उपस्थित होते. त्याशिवाय, जलसंपदा विभागाचे सचिव  दीपक कपूर आणि इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत आज मुंबईतील सागर बंगल्यात बैठक पार पडली. 


पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातील काही भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून पाणी वाहून जाते. त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. पुराच्या परिणामी जनजीवन आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये  होत असते. यासाठी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे पाणी  सातारा जिल्ह्यातील माण, खटाव फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग, सोलापूर आणि मराठवाडा या भागातील जनतेला दिल्यास मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागातील जमीन ओलिताखाली येणार असल्याची बाब निदर्शनास खासदार  निंबाळकर यांनी आणून दिली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.


हा प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा असून  त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद  करण्याचे आदेश आज पारित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेसाठी ही  मोठी भेट असणार आहे. यामुळे  भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटून हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होणार असून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 


महाराष्ट्र राज्यातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा व पश्चिम किनारा (कोकण) या पाच प्रमुख नद्यांच्या खोर्‍यांतून उपलब्ध होणार्‍या एकूण 4758 अब्ज घनफूट पाण्यापैकी 1079 अब्ज घनफूट पाणी कृष्णा खोर्‍यातून उपलब्ध होते. महाराष्ट्रातील एकूण प्रमुख पाच नदी खोर्‍यांपैकी एकट्या कृष्णा खोर्‍यातून महाराष्ट्रात 26.58 टक्के म्हणजेच एकूण उपलब्ध पाण्यापैकी एक चतुर्थांशपेक्षा अधिक पाणी उपलब्ध होते. त्यावरून महाराष्ट्रासाठी कृष्णा खोर्‍यातील पाण्याचे महत्व आपल्या लक्षात येते. कृष्णा खोर्‍यात महाराष्ट्राचे 69 लक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्र येते. तर त्यापैकी 6 लक्ष हेक्टर म्हणजे मराठवाड्याचे 10 टक्के भौगोलिक क्षेत्र येते.


महाराष्ट्रातील एकूण 94 अवर्षणप्रवण तालुक्यांपैकी 56 तालुके कृष्णा खोर्‍यात येतात. तर त्यापैकी 12 अवर्षणप्रवण तालुके मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे मराठवाड्यासारख्या अवर्षणप्रवण विभागासाठी कृष्णा खोर्‍याच्या पाण्याचे महत्त्व अधिक आहे. 


महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे खोरे हे प्रामुख्याने  कृष्णा उपखोरे आणि भीमा उपखोरे यामध्ये विभागले आहे. उपखोर्‍याचे क्षेत्र व त्यातून जलनिष्पत्ती म्हणजेच खोरेनिहाय पाणी उपलब्धतेच्या अभ्यासानुसार असे निदर्शनास आले की, 27 टक्के कृष्णा उपखोर्‍यातून 65 टक्के जलनिष्पत्ती उपलब्ध होते. तर 73 टक्के भीमा खोर्‍यातील क्षेत्रातून 35 टक्के जलनिष्पत्ती उपलब्ध होते. त्यामुळे कृष्णा उपखोर्‍यातील जास्तीचे पाणी तीव्र टंचाईचे क्षेत्र असलेल्या असलेल्या भीमा खोर्‍यात वळविण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास फेब्रुवारी 2004 मध्ये रूपये 4932.00 कोटी किंमतीसाठी प्रशासकीय मान्यता दिली.