Nashik News : सद्यस्थितीत पावसाचे दिवस असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पर्यटनाला बहर आला आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले गड किल्ल्यांकडे वळू लागली आहेत. मात्र अनेकदा हौशी पर्यटकांसह हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांकडून गड किल्ल्यांची नासधूस केली जाते. त्याचबरोबर अनेक पर्यटकांकडून किल्ल्यांवर मद्यसेवनही केले जाते. या सगळ्यांना चाप बसावा यासाठी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.  


नाशिकसह राज्यातील अनेक भागात सध्या जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे पर्यटक नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर गर्दी करत आहेत. अशातच पावसाळ्यात गड किल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मात्र अनेकदा दारू पिऊन गड किल्ल्यांवर गोंधळ घातल्याचे प्रकार सर्रास समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या (Nashik Excise Department) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  गड किल्ल्यांवर गोंधळ घातल्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर जर पुन्हा अपराध केल्यास त्यासाठी वाढीव शिक्षेची तरतूद केल्याचे नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी सांगितले. 


महाराष्ट्रातील (Maharashtra Fort) गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा पुरातन वास्तूंच्या ठिकाणी कोणी इसम मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी कळविले आहे. उपरोक्त कायद्यान्वये पहिल्या अपराधास 6 महिन्यांपर्यंत सश्रम कारावासाची आणि रूपये 10 हजार पर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. 


इथे साधा संपर्क 


महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शौर्याची पराक्रमाचे साक्षीदार आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणारे अनेक जण या गड किल्ल्यांना भेट देतात. अनेक गड किल्ल्यांची पडझड झाली आहे. तर, या गड किल्ल्यांना भेट देणारे काही समाजकंटक येथे  मद्य प्राशन करुन येथे धिंगाणा घालतात. यामुळे इतिहास प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर गड, किल्ले या ठिकाणी व्यक्ती मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागतांना आढळल्यास नागरिकांनी नाशिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या 0253-2581033 या दूरध्वनी क्रमाकांवर तसेच  आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई  कार्यालयाच्या 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर व 8422001133 या व्हॉट्ॲप क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक श्री. गर्जे यांनी केले आहे.


इतर संबंधित बातम्या : 


गड किल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनो सावधान, आता कारावास होणार