Maharashtra Day: महाराष्ट्र राज्य हे वैविधतेने नटलेले आहे. महाराष्ट्राची विभागणी छोट्या-छोट्या प्रदेशात केली असून प्रत्येक प्रदेशाची एक विशेषत: आहे. प्रत्येक प्रदेश बोलीभाषा, लोकगीते, खाद्यपदार्थ आणि जातीयतेच्या रूपाने वैविध्यपूर्ण आहे. विविध समुदायांच्या आकर्षक परंपरांनी त्यांची अनोखी आणि आगळीवेगळी संस्कृती जपली गेली आहे, ज्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक जीवनात मोहकता वाढली आहे.


वैविध्यपूर्ण महाराष्ट्राचा पारंपरिक पोशाख मात्र एकच आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी पुरुष पारंपारिक पोशाख; म्हणजेच धोतर आणि फेटा परिधान करतात. ग्रामीण महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणे पांढरा कुर्ता (लांब शर्ट), धोतर आणि गांधी टोपी हा लोकप्रिय पोशाख आहे. गावाखेड्याकडे अजूनही ही परंपरा जोपासली जाते.


महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी साडी, विशेषत: नऊवारी साडी हा पारंपरिक पोशाख आहे. अनेक वर्षांच्या चालीरितींनुसार, काष्टा साडी किंवा नऊवारी साडी ही महाराष्ट्राची परंपरा ठरली आहे. काष्ट म्हणजे साडीला पाठीमागून खोचणे. महाराष्ट्रीय धोतर ज्या प्रकारे परिधान केली जाते त्याचप्रकारे नऊवारी साडी नेसली जाते. बदलत्या काळानुसार नऊवारी साडी नेसण्याची परंपरा ही विरळ होत चालली आहे. परंतु सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आजही नऊवारीची परंपरा चालत आली आहे.


सांस्कृतिक कार्यक्रमांवेळी नऊवारी साडी (Nauvari Saree) आणि त्यावर मराठमोळे दागिने (Ornaments) घालण्याचा मोह आजही तरुणींना आवरत नाही. आजही महाराष्ट्रातील मराठमोळा साज विविध लग्न समारंभांमध्ये पाहायला मिळतो. जुन्या काळातील फॅशन (Old Fashion) पुन्हा नव्याने रुजू होतात, त्याप्रमाणेच आता लग्नातही नऊवारी लूकचा विशेष ट्रेंड आहे.


नऊवारीचा इतिहास


नऊवारी हा पोशाख केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही, तर इतिहासातील शूर महिलांनी या पोशाखात युद्धे देखील लढली आहेत. इतिहास जागवणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई, अहिल्याबाई ह्या नऊवारीतच वावरल्या. सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी ह्यांनी आपल्या कामाचा प्रसार नऊवारी नेसूनच केला. ग्रामीण भागात नऊवारी लुगडे म्हणून प्रसिद्ध आहे, गावाखेड्याकडे आजही महिला ही लुगडी परिधान करून शेतात काम करतात.


कसा असतो महाराष्ट्रीयन नऊवारी साज?


नऊवारी ही एक महाराष्ट्रीयन शैलीची साडी आहे, ती नऊ मीटरची साडी आहे. ही साडी धोती स्टाईलमध्ये नेसतात. बहुतेक वधू त्यांच्या लग्नाच्या दिवशी नऊवारी नेसतात. आजही या जुन्या साडीच्या स्टाईलला मराठी वधूंच्या यादीत अग्रस्थान आहे. या नऊवारीवर सोन्याचे आणि पारंपारिक महाराष्ट्रीय दागिने घातले जातात. मराठी लूकसाठी गळ्यात ठुशी, कोल्हापुरी साज, नथ यांचा समावेश केला जातो. महाराष्ट्रातील परंपरेनुसार, हातात हिरव्या बांगड्या घातल्या जातात.


डोक्यापासून पायापर्यंत महाराष्ट्रातील परंपरेचे दर्शन


महाराष्ट्राला राजघराण्यांची आणि पेशव्यांची परंपरा लाभली आहे. मराठी राण्या त्यांचा राजेशाही थाट, सौंदर्य आणि शौर्यासाठी प्रसिद्ध होत्या. नाकात नथ, गळ्यात राणी हार, कपाळी चंद्रकोर, हातात चुडा, आणि केसांचा अंबाडा घालून त्यावर गजरा आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा पेशवाई पोशाख महाराष्ट्रात चालत आला आहे.  या पोशाखात डोक्यापासून पायापर्यंत महाराष्ट्रातील परंपरेचे दर्शन होते.


परदेशातील स्त्रियांनाही साडीचा मोह


महाराष्ट्राची परंपरा हळूहळू सातासमुद्रांपार पसरत आहे. परदेशातील स्त्रियांनाही महाराष्ट्राच्या साडी या वस्त्राचे विशेष कुतूहल आहे. परदेशात होत असलेल्या भारतीय सणांमध्ये विशेषत: गणेशोत्सवात बरेच परदेशी स्त्रिया या साडी परिधान केलेल्या दिसतात. 


नुकताच प्रसिद्ध झालेला नऊवारी रॅप


महाराष्ट्राच्या एका तरुणीने आपल्या महाराष्ट्रीय पोशाखावर एक रॅप लिहिला होता, त्यानंतर देशभरात या गाण्याची एकच चर्चा झाली. अमरावतीची आर्या जाधव हिने अलीकडेच MTV या वाहिनीवरील Hustle 2.o या कार्यक्रमात चांगलेच नाव कमावले. यावेळी तिने चक्क मराठीत रॅप सादर केला.






हसल 2.0 या कार्यक्रमात मराठमोळी नऊवारी नेसून आर्या जाधव जेव्हा स्टेजवर आली तेव्हा सर्वचजण थक्क झाले. नऊवारी, मोकळे केस, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा मराठमोळा भन्नाट लूक घेऊन रॅप सादर करुन आर्याने सर्वांचेच मन जिंकले. तिच्याद्वारे आपली मराठी परंपरा आणि लावणीचा साज अनेक राज्यांसह इतर देशांतही पोहोचला.


संबंधित बातमी:


Maharashtra Fort : दगडांच्या देशा, कणखर देशा..महाराष्ट्र देशा...कसे पाहाल महाराष्ट्रातील 'हे' गड-किल्ले?