Maharashtra Day 2023 : महाराष्ट्राला (Maharashtra) ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक अमूल्य गोष्टींचा वारसा लाभला आहे. सह्याद्रीच्या (Sahyadri) पर्वतरांनी, शिवरायांच्या विचारांनी ही महाराष्ट्र भूमी पावन झाली आहे. महाराष्ट्राला जितका अमूल्य गोष्टींचा वारसा लाभला आहे तितकाच थोर विचारवंतांचा समाजसुधारकांचा देखील वारसा लाभला आहे. हा विचारांचा वारसा महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील लोकांना प्रेरित करत आहे. इथल्या नद्यांमध्ये देखील विचारांची ही झोत कायम वाहताना दिसत असते.
'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी इतिहास रचला. या वीर हुतात्म्यांच्या बलिदानासाठी महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहिल. या 106 पैकी प्रत्येकाचे बलिदान महाराष्ट्राच्या वर्तमानात आणि भविष्यात अखंड राहिल. याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
आपल्याला टिळक, आगरकर, फुले या थोर व्यक्तींचे कार्य माहितच आहे. परंतु महाराष्ट्रातील या हुतात्म्याविषयी जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. यापैकी काही हुतात्म्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
स्वंतत्र भारतानंतर भाषांवर आधारित भारतातील प्रांतांची रचना करण्यात आली. याच काळात मराठी भाषिक महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने बीज पेरले. 1954 रोजी मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची पूर्ण करण्यात आली. परंतु या अहवालात महाराष्ट्राला दुजाभाव देण्यात आला. त्याचबरोबर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडल्याची भावना जोर धरली होती. त्यामुळे या असंतोषाच्या भावनेचा उद्रेक होऊन महाराष्ट्रात या आयोगाविरोधात बंड पेटले.
सिताराम बनाजी पवार
या 106 हुतात्म्यांपैकी सिताराम बनाजी पवार हे पहिले हुतात्मे होते. त्यांचा जन्म दापोली तालुक्यातील गुजर या गावी झाला. त्यांच्या लहानपणी आईचे छत्र त्यांच्यापासून दूर गेले आणि त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला. ते पुढे मुंबईत राहण्यास आले. मुंबईतील गिरगाव भागात त्यांनी त्यांचे पुढील आयुष्य घालवले. त्यांना इंग्रजी भाषेची फार आवड होती. याच आवडीसाठी त्यांनी मुंबईतील विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच वेळी तिथल्या संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांनी ते भारावून गेले. फाजल अली यांच्याविरोधात निदर्शने करण्यास 21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईतील फ्लोरा फाऊंटन या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. परंतु आदोलकांचा आक्रोश वाढतच होता त्यामुळे पोलिसांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सिताराम पवार यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या हातून पिस्तून हिसकावून घेत पोलिसांवर झडप घेतली. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात त्यांना पाच गोळ्या लागल्या. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी सर्वात मोठे बलिदान दिले.
निवृत्त विठ्ठल मोरे आणि गंगाराम मोरे
इतिहासात मोरे घराण्याचं नाव सर्वांनाच माहित आहे. जावळीचे मोरे ते संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीती मोरे. या 106 हुतात्म्यांमध्ये विठ्ठल मोरे आणि गंगाराम मोरे यांनी देखील मोलाचे कार्य केले.
गजानन ऊर्फ बंडू गोखले
गजानन उर्फ बंडू गोखले हे मुंबईतील गिरगावात राहणारे रहिवासी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ सुरु असताना मुरारजी देसाईंनी चळवळीत सहभागी झालेल्या लोकांवर गोळ्या झाडण्याचे निर्देश दिले होते. 16 जानेवारी 1956 रोजी गजानन पवार हे त्यांच्या वसतिगृहातून बाहेर पडले होते. त्याच वेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कमलाबाई मोहिते
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महिलांचा देखील तितकाच वाटा होता. महिलांनीही या लढ्याचे नेतृत्व करत गोळीबार झेलला, तुरुंगवास भोगला. श्रीमती कमलाबाई मोहिते या मूळच्या बेळगावातील निपाणी गावच्या. परंतु मुंबईत वास्तव्यास आल्यानंतर त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांनी भारावून टाकले. त्यांनी या चळवळीत सहभाग घेऊन महाराष्ट्रासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करलं.
धर्माजी गंगाराम नागवेकर
मुंबई संपूर्ण आयुष्य घालवलेल्या धर्माजी नागवेकरांनी मुंबईसाठी आपले संपूर्ण आयुष्य दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांची भूमिकाही फार महत्त्वाची ठरली.
ही या सुवर्ण यादीतील काही नावे आहेत. या प्रत्येकाचे कार्य हे तितकेच अमूल्य असून महाराष्ट्राच्या इतिहासाचे ते सोनेरी पान आहे.