Maharashtra Fort : 1 मे 1960 साली महाराष्ट्र (Maharashtra) राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्रात सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा अनेक अमूल्य ठेवा आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी अनेक मावळ्यांच्या बलिदानाची साक्षीदार आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले (Fort) शिवरायांचा आणि त्यांचा मावळ्यांच्या शर्थीची आजही ग्वाही देतात. यातील बरेच किल्ले हे मुघलांच्या ताब्यातून शिवरायांनी स्वराज्यात आणले. म्यानातून शिवरायांच्या तलवारीची पात उसळली आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या तलवारीचे ऋणी झाला. वेडात दौडलेले सात मराठे असो किंवा आधी कोंढाण्याचं लगीन लावणारे मावळे असो या प्रत्येकाच्या शौर्याने महाराष्ट्राचा इतिहास कायम ज्वलंत राहिल यात शंका नाही. 


महाराष्ट्राची समृद्धी असलेले गड-किल्ले पाहून या इतिहासाची नव्याने ओळख होते. रायगड, प्रतापगड, सिंहगड यांसारखे अनेक किल्ले आपल्याला माहित आहेत. पण आज अशा किल्ल्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्याविषयी फारशी माहिती नाही. हे किल्ले कसे पाहावेत, या गड-किल्ल्यांवर कसे पोहोचावे हे देखील जाणून घेऊया. 


1. हरिश्चंद्रगड 


या यादीतील पहिला किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड अहमदनगर जिल्हाच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला 4000 फूट उंचीचा अभेद्य किल्ला आहे. या गडाचा इतिहास हा कुतूहल निर्माण करणारा आहे. तर याचा भूगोल विश्लेषणात्मक आहे. एखादा स्थळाचा किती उत्तमरित्या अभ्यास करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा किल्ला आहे. या गडाला ऐतिहासिक तसेच पौराणिक पार्श्वभूमीदेखील आहे. हरिश्चंद्र गडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात आणि मत्स्यपुराणात देखील आढळतो. 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि कृष्णाची शिंदे यांची किल्लेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


गडावर कसे पोहोचाल?


हा किल्ला ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे जिल्ल्ह्यातून खिरेश्वरकडील वाट जवळ आहे. पुण्यातून आळेफाटामार्गे जाता येईल. हरिश्चंद्रगडावर खिरेफाटा गावांतून देखील जाता येईल. तसेच पुण्यातून खिरेश्वरपर्यंत बसनेही जाता येते. ठाणे जिल्ह्यातून नगरकडे जाणारी बसमधून खुबी फाटा येथे उतरावे. तेथून खासगी बसने खिरेश्वरगावाकडे जाता येते. खिरेश्वर गावापासून हरिश्चंद्रगड 7 किमी अंतरावर आहे. सप्ततीर्थ पुष्कर्णी, केदारेश्वर गुहा, कोकण कडा, हरिश्चंद्रगडावरील लेणी ही ठिकाणे या गडावर पाहण्यासारखी आहेत. 


2. हरिहर गड


सह्याद्रीच्या रांगांमध्ये आपले वेगळेपण जपणारा हरिहर गड आहे. या किल्ल्याला हर्षगड देखील म्हटले जाते. हा गड 3676 फूट उंच असलेला नाशिक जिल्ल्ह्यातील एक किल्ला आहे. या गडाचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या गडावर चढण्यासाठी कातळ पायऱ्या आहेत. 


गडावर कसे पोहोचाल? 


गडाच्या पायथ्याशी निरगुडपाडा हे गांव आहे. या गावातून या गडावर जाणारी वाट आहे. नाशिकमधून निरगुडपाडा गावापर्यंत बस जाते. तसेच कसारा-खोडाळ मार्गावरुन जाताना देवगावपासून 1 किमी अंतरावर खोडाळ-टाके मार्गाने गेल्यास निरगुडपाडा हे गाव लागते. गडावरील तलाव, त्याच्या काठावर हनुमानचे मंदिर, महादेवची पिंड ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत 


3. कलावंतीण दुर्ग  


कलावंतीण किल्ला हा रायगड जिल्ल्ह्यतील प्रबळगड किल्ल्याजवळ स्थित आहे. 2250 फूट उंच असलेल्या या किल्ल्याच्या पश्चिमेकडे मुंबई शहर आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पनवेल शहराजवळ हा किल्ला आहे. हा संपूर्ण गड चढण्यासाठी खडक कापून त्याच्या पायऱ्या बनवल्या आहेत. कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे


गडावर कसे पोहोचाल? 


हा गड मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर स्थित आहे. राष्ट्रीय महामार्ग चार वरुन शेडूंग फाट्याजवळून या गडावर जाण्याचा मार्ग आहे. कळंबोलीपासून जेथे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग जोडला जातो तेथे हा शेडूंग फाटा लागतो. पनवेलमधील ठाकुरवाडी गावामध्ये उतरुन देखील गडाच्या दिशेने जाता येते. तसेच पनेवल ते ठाकूरवाडी बससेवा देखील उपलब्ध आहे. दगडात कोरलली गणपतीची अन् हनुमंताच्या मूर्ती या गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत. 


4. वासोटा 


नैसर्गिक सौंदर्य लाभलेला हा किल्ला अनेक पर्यटकांचे आकर्षण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दातेगडाच्या रांगेत हा किल्ला स्थित आहे. सातारा जिल्ल्ह्यातील या किल्ल्याला पौराणिक महत्त्व देखील आहे. वसिष्ठ ऋषींचा शिष्य या गडावर वास्तव्यास होता आणि त्याने या किल्ल्याला त्याच्या गुरुंचे नाव दिले असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांनी 1660 रोजी हा किल्ला जिंकून घेतला. 


गडावर कसे पोहोचाल? 


या गडावर दोन मार्गांनी जाता येते. कोकणातून आणि दुसरा घाटातून. वासोट्याच्या पश्चिमेकडे चोरवणे गाव आहे. चिपळूणमधून त्या गावापर्यंत बसने जाता येते. चोरवणेपासून नागेश्वरपर्यंत गेल्यावर वसोट्यावर जाता येते. दुसरा मार्ग हा साताऱ्यातून जातो. सातारा-कास-बामणोली या मार्गाने जाता येते आणि हा मार्ग जास्त सोयीचा आहे. बामणोलीला उतरुन मग बोटीने वनखात्याच्या परवानगीने वासोट्यापर्यंत जाता येते. शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा याचा आनंद घेता येतो. 


5. चांभारगड


रायगड जिल्ह्यातील हा एकमेव किल्ला आहे ज्याला एखाद्या जातीचे नाव दिले गेले आहे. हा किल्ला 1200 फूट उंच आहे. या किल्ल्यावरुन राजधानीवर हल्ला करणे कठीण जाते, त्यामुळे शिवरायांच्या काळात हा किल्ला उभारला गेल्याचं सांगितलं जातं. महाड शहरातील चांभारखिंड वस्तीजवळ हा किल्ला स्थित आहे. 


गडावर कसे पोहोचाल? 


चांभारखिंड वस्तीजवळून 5 मिनिटांवर चालत गेल्यावर या गडाची वाट सुरु होते. महाडमधून चांभारखिंड गावापर्यंत बसने जाता येते. खोपोली, पाली, माणगाव या गावातून देखील खासगी वाहनाने  चांभारखिंड गावापर्यंत जाता येते. 


6. केंजळगड


सातारा जिल्ल्ह्यात कृष्णा आणि नीरा नदीच्या काठावर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या जवळच रायरेश्वराचे पठार आहेत. केंजळगडाला केलंजा आणि मनोहरगड या नावाने देखील ओळखले जाते. 1674 मध्ये शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करुन घेतला. 


गडावर कसे पोहोचाल? 


गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. रायरेश्वर, कोर्ले आणि वाई. भोरवरुन एसटी मार्गाने कोर्ले गावापर्यंत जाता येते आणि तिथून गडापर्यंत जाण्याचा वाट सुरु होते. मुंबईवरुन सातारा-कोल्हापूर हायवे मार्गे वाई तालुक्यातून एसटीने खावली या गावातून केंजळगडास जाण्याचा रस्ता आहे. गडावर गुहा, गोड्या पाण्याचे तळे या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. 


महाराष्ट्रातील या गडकिल्ल्यांना भेट देऊन याचा इतिहास नक्की जाणून घ्या.